पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

महापालिकेतर्फे दरवर्षी कर्मचारी व अधिकाऱ्यांना बोनस दिला जातो. गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे व लोकप्रतिनिधी यांच्या वादात बोनस अडकल्याने कर्मचाऱ्यांना तो उशिरा मिळाला होता; परंतु या वेळी कर्मचाऱ्यांना वेळेवर बोनस मिळावा यासाठी प्रशासनाने नियोजन करून त्याचा प्रस्ताव स्थायी समिती व महासभेच्या पटलावर सादर केला होता

नवी मुंबई - महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यावेळीही कायम व कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदानाचे वाटप केले. यात कायम आस्थापनेवरील कामगारांना 20, तर कंत्राटी कामगारांना 15 हजार दिले आहेत. हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाल्याने त्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी झाली आहे.

महापालिकेतर्फे दरवर्षी कर्मचारी व अधिकाऱ्यांना बोनस दिला जातो. गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे व लोकप्रतिनिधी यांच्या वादात बोनस अडकल्याने कर्मचाऱ्यांना तो उशिरा मिळाला होता; परंतु या वेळी कर्मचाऱ्यांना वेळेवर बोनस मिळावा यासाठी प्रशासनाने नियोजन करून त्याचा प्रस्ताव स्थायी समिती व महासभेच्या पटलावर सादर केला होता. यात स्थायी समितीने चर्चा करून तो तात्काळ मंजूर केला व महासभेच्या मंजुरीसाठी पाठवला होता. महासभेतही बोनसवर फारशी चर्चा न करता ठरलेल्या रकमेत काहीअंशी वाढ करून शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्यामुळे बोनस वितरित करण्यासाठी प्रशासनाला पुरेसा वेळ मिळाला. नवी मुंबई महापालिकेच्या कायम आस्थापनेवरील दोन हजार 958 अधिकारी व कर्मचारी यांना 20 हजार आणि ठोक पगारावरील अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानसेवी अधिकारी अशा 773 जणांना 15 हजार बोनस मिळाला आहे. प्रशासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर बोनसची रक्कम मिळाल्याने त्यांची दिवाळी उत्साहात व आनंदात साजरी होणार आहे.

Web Title: mumbai news: bonus diwali