महापालिकेचा वाचन प्रेरणा दिन!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शनिवारी (ता. १४) शहरात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जाणार आहे. हे वर्ष ज्येष्ठ साहित्यिक व कवी विं. दा. करंदीकर यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांना चार लाख पुस्तके वाटण्यात येणार आहेत, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. यात विंदांच्या काव्यसंग्रहासह काही बालकवींची पुस्तके देण्यात येणार आहेत. 

‘वाचाल तर.. वाचाल’ या धोरणाचा अवलंब करीत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी, वाचनाबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १४ ऑक्‍टोबर हा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस देशभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे सर्व शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा केला जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांना पुस्तके वाटण्याचा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. विंदांच्या साहित्याबद्दल माहिती मिळावी व त्यांचा काव्यसंग्रह वाचायला मिळावा, यासाठी करंदीकरांचा काव्यसंग्रह व बालकवींचे पुस्तके मोफत देण्यात येणार आहेत. महापालिकेच्या ७२ शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ३५ हजार विद्यार्थी शिकत असून त्यांना चार लाख २० हजार पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. पॉप्युलर प्रकाशन यांच्याकडून ५० टक्के सवलतीच्या दरात ही पुस्तके महापालिकेला मिळणार असून या पुस्तकांसोबत ‘वयम्‌’ हा दिवाळी अंकही देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या काव्यसंग्रहातून त्यांच्या शब्दभांडारात भर पडण्यास मदत होईल, असे शिक्षण अधिकारी संदीप संगवे यांनी सांगितले.

Web Title: mumbai news book Reading Inspiration Day