शहाळ्यांच्या कचऱ्यापासून विटा

किरण कारंडे
बुधवार, 5 जुलै 2017

महापालिकेचा उपक्रम; दहन संस्कारांसाठी होणार उपयोग

महापालिकेचा उपक्रम; दहन संस्कारांसाठी होणार उपयोग
मुंबई - रुग्णाला भेटण्यासाठी जाताना अनेक जण हमखास शहाळे घेऊन जातात; पण त्यापासून तयार होणाऱ्या कचऱ्याचा कोणीही विचार करत नाही. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालय परिसरातच त्याची विल्हेवाट लावण्याची संकल्पना महापालिकेची आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक क्रशर मशिनचा उपयोग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या विटांचा उपयोग दहन संस्कारांसाठी करता येणार आहे.
मुंबईत दररोज 8 हजार 600 मेट्रिक टन कचरा तयार होतो. त्यापैकी 400 मेट्रिक टन कचरा केवळ शहाळी आणि उसापासून तयार होतो.

त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास महापालिकेने अग्रक्रम दिला आहे. त्यासाठी क्रशर मशिनचा उपयोग करण्यात येणार आहे. या यंत्राच्या साहायाने शहाळी आणि उसाच्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या विटांचा उपयोग अंत्यसंस्काराच्या वेळी दहनासाठी होऊ शकतो.

परळ परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालये आहेत. त्यामुळे या परिसरातील शहाळ्यांच्या कचऱ्यापासून अधिक विटा तयार करणे शक्‍य आहे. एफ साऊथ वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.

अशा होतात विटा
शहाळी आणि उसाच्या कचऱ्याचे बारीक तुकडे करण्यात येतात. त्यानंतर तो कचरा वाळवून त्यापासून भुकटी तयार करण्यात येतो. या भुकटीच्या विटा तयार करण्यात येतात.

पर्यावरण रक्षण होणार
ग्रीन वेस्टमुळे झाडांची कत्तल आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यास मदत होईल, असा विश्‍वास पालिकेचे अधिकारी व्यक्त करत आहेत. सध्या अंधेरीत अशा प्रकारचे क्रशर मशिनचा उपयोग सुरू आहे. काही दिवसांमध्ये एफ साऊथ विभागातील सगळ्या मोठ्या रुग्णालयांमध्ये क्रशर बसवण्यात येणार आहे.

शहाळी आणि उसाचा कचरा वजनाने हलका असतो. तो डंपिंग ग्राउंडमधील अधिक जागा व्यापतो. त्यामुळेच कचऱ्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत पर्यावरण रक्षणासाठी उपयुक्त वस्तू तयार करण्याचा मानस आहे. रुग्णालयातील शहाळी जमा करण्यासाठी काही संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे.
- विश्वास मोटे, सहायक आयुक्त, महापालिका

Web Title: mumbai news bricks making by coconut garbage