कर्करोग निदानासाठी आरोग्य विभागातील महिलांना प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

मुंबई - भारतात स्तनाच्या, तोंडाच्या तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. अनेक जण सुरवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजार वाढत जातो. हे टाळण्यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयातर्फे राज्य सरकारच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिलांना या रोगाचे निदान करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यात वैद्यकीय अधिकारी आणि "पॅरामेडिकल'च्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.

राज्य सरकारच्या सहकार्याने हे प्रशिक्षण देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सातारा आणि पुणे जिल्ह्यातील 50 महिला अधिकाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती टाटा कर्करोग रुग्णालयाच्या डॉ. शर्मिला पिंपळे यांनी दिली. या प्रशिक्षणामुळे आजाराच्या पहिल्या टप्प्यात निदान करणे शक्‍य होईल; तसेच या कामासाठी आवश्‍यक मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे त्या म्हणाल्या; तर ग्रामीण भागांतील महिलांमध्ये रोगाचे निदान वेळेत करता यावे, या हेतूने हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयातील डॉ. गौरवी मिश्रा यांनी दिली. कमी वेळात हे प्रशिक्षण देता यावे, यासाठी व्हिडिओ ट्युटोरिअल्सचा वापर करण्यात येणार आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संस्थेने असंसर्गिक आजारांना प्रतिबंध आणि नियंत्रित करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प तयार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. 2025 पर्यंत असंसर्गिक आजारांमुळे होणारे मृत्यु 25 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: mumbai news cancer health department women training