चंद्रशेखरची महागड्या गाड्यांची खरेदी

अनिश पाटील
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबईतील फसवणूक केलेल्या 500 गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासाठी पैसे नसल्याचा दावा करणारा ठकसेन शेखर ऊर्फ सुकेश चंद्रशेखरने नुकतीच न्यायालयीन कोठडीत असताना पोलिस बंदोबस्तात बेन्टली व मर्सिडीज सारख्या तीन महागड्या कारची खरेदी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी नुकतेच दिल्लीतील सात पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यात मुंबई हवाला रॅकेटचा संबंध असल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील 500 गुंतवणूकदारांना 20 कोटींचा गंडा घालणाऱ्या चंद्रशेखरने गेल्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना एक रुपयाही परत केला नाही. दरवेळी न्यायालयात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना देण्यास पैसे नसल्याचे सांगणाऱ्या चंद्रशेखरने बंगळुरूमधून नुकत्याच तीन महागड्या कार खरेदी केल्याचे समोर आले आहे. महागड्या वस्तूंची खरेदी झाल्यामुळे बंगळुरूतील प्राप्तिकर विभागाच्या रडारवर तो आला व त्यानंतर एस्कॉर्ट पोलिसांच्या मदतीने तो राजरोसपणे सर्व प्रकार करत असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, तमिळनाडूतील अद्रमुकच्या एका गटाने अद्रमुकचे दोन पानांचे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावे, यासाठी चंद्रशेखर याच्यामार्फत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर चंद्रशेखरला 16 एप्रिल, 2017 रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलातून दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे 1 कोटी 30 लाख रुपयांची रोकड सापडली. अद्रमुकमधील एका गटाला दोन पाने असलेले निवडणूक चिन्ह पोटनिवडणुकीसाठी हवे होते. त्यासाठी चंद्रशेखरने मध्यस्थाबरोबर निवडणूक अधिकाऱ्यांशी संधान साधून पन्नास कोटी रुपयांना व्यवहार ठरवला होता. या निवडणूक चिन्हावर पक्षाच्या शशिकला आणि पनीरसेल्वम या दोन्ही गटांनी दावा सांगितल्यामुळे हे चिन्ह गोठवण्यात आले होते. चंद्रशेखरने अशाच पद्धतीने मुंबईतील 500 गुंतवणूकदारांनाही 20 कोटी रुपयांचा फसवले होते. त्याप्रकरणी त्याला मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनेही अटक केली होती.

Web Title: mumbai news chandrashekhar modern vehicle purchasing