मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

मुंबई, अलिबाग - निलंग्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच शुक्रवारी (ता. 7) अलिबागमध्येही त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याने ते अपघातातून बचावल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र असा कोणताही अपघात झालेला नाही, असे स्पष्ट केल्याने गोंधळात भर पडली आहे.

अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहाचे उद्‌घाटन आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांचे अभीष्टचिंतन करून मुख्यमंत्री फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे मुंबईकडे येत होते. ते त्यांच्या स्वीय सहायकांसह दुपारी 1.55 मिनिटांनी धरमतर (पेण, रायगड) येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या हेलिपॅडवर आले. ते हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच त्याचा पंखा सुरू झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून मुख्यमंत्र्यांना तेथून बाजूला केले; अन्यथा त्यांच्या डोक्‍याला हेलिकॉप्टरचा पंखा लागला असता, अशी बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.

या कथित वृत्ताविषयी रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर म्हणाले, 'मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते अचानक उड्डाण करू लागले. त्यामुळे ते तेथून दूर झाले. पायलटने हेलिकॉप्टरचे लॅंडिंग करून पंख्यांची चाचणी घेतली. ते सुरक्षित असल्याची खात्री पटल्यामुळे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री त्याच हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले.''

अफवांवर विश्‍वास ठेवू नका!
हेलिकॉप्टर अपघाताच्या या कथित वृत्ताचा मुख्यमंत्री कार्यालयाने त्वरित इन्कार केला. असा कुठलाही अपघात झालेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाने पत्रकाद्वारे केले आहे.

Web Title: mumbai news Chief Minister's helicopter accident?