मोबाईल, कार्टूनमध्ये हरवली पाखरे...

मोबाईल, कार्टूनमध्ये हरवली पाखरे...

कल्याण - काही वर्षांपूर्वी काही मिनिटांसाठी दूरदर्शनवर प्रसारित होणारे ‘स्पायडरमॅन’ ,‘टॉम अँड जेरी’, ‘मोगली’ हे कार्टून पाहण्यासाठी बच्चे कंपनीचा उत्साह ओसांडून वाहत असे. याच कार्टूनच्या माध्यमातून मुले निखळ मनोरंजनाचा आनंद घेत. त्यांची वेळही मर्यादित असल्याने पालकही स्वतःहून मुलांना कार्टून पाहण्याची परवानगी देत असत; मात्र स्पर्धेच्या युगात विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानामुळे १९९० नंतर २४ तास कार्टून प्रसारित करणाऱ्या वाहिन्यांचे पेव फुटले आणि मुलांची दुनियाच जणू कार्टूनमय होऊ लागली. आजच्या ई-वर्ल्ड मधील ई-चाईल्डचे बालपण हे  मोबाईल गेम आणि कार्टूनच्या चक्रव्यूहात गुरफटत चालले आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

वाहिन्यांमुळे मुलांना दुर्मिळातील दुर्मिळ कार्टून मालिका, चित्रपट पाहिजे तेव्हा पाहता येतात. अमेरिकेबरोबर जपानी कार्टूनचाही शिरकाव झाला. डोरेमॉन, शिनचॅन यासारखे कार्टून मुलांमध्ये लोकप्रिय असून ही लोकप्रियता पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शाळेत जाताना, शाळेतून आल्यावर, सुट्टीच्या दिवशी कार्टून पाहण्याची सवयच मुलांना जडली आहे. मुले कार्टूनच्या संपूर्ण आहारी जात असल्यामुळे पालकही चिंतातूर झाले आहेत. कार्टून पाहणे ही वाईट बाब नसली, तरी मुले त्याच्या आहारी जाऊ लागली असल्याचे चित्र घराघरात दिसत आहे. मात्र त्यातील काही थिम्स, शब्दोच्चार, दृश्‍ये आक्षेपार्ह असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रत्येक कार्टूनपट दर्जेदारच असेल याची शाश्‍वती आता देता येत नाही. कडाक्‍याच्या उन्हात मुले खेळण्यासाठी बाहेर जाणे टाळून कार्टून वाहिन्यांमध्ये रममाण झाल्याचे दिसते. सुट्टीच्या काळात तर कार्टून वाहिन्यांचाही टीआरपी कमालीचा वाढतो.

पालकांना वेळ नसल्यामुळे ते मोबाईल आणि टीव्हीवर मुलांना कार्टून लावून देतात. मुले कार्टूनच्या इतक्‍या आहारी जातात, की ते विशिष्ट कार्टूनच्या आवाजात बोलतात आणि ते कार्टून जे जे काही करतं, तसं करायला बघतात. पालकांनाही याचे कौतुक वाटते; पण यामुळे मुले किशोरवयात येताना खूप हट्टी होतात. पालकांचे अजिबात ऐकत नाहीत. तेव्हा पालकांना या गोष्टींचा दुष्परिणाम समजतो. 
- डॉ. चेतन नेरकर, बालमानसोपचार तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com