मुंबईत ११ वर्षांनंतर होणार सर्कस

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

मुंबई - मुंबई शहरात ११ वर्षांनंतर पुन्हा सर्कस होणार आहे. दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदान सर्कससाठी देण्यास महसूल विभागाने सोमवारी (ता. ६) परवानगी दिली. हे मैदान ओव्हल ट्रस्टकडून महसूल विभागाने पुन्हा ताब्यात घेतले आहे.

मुंबई - मुंबई शहरात ११ वर्षांनंतर पुन्हा सर्कस होणार आहे. दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदान सर्कससाठी देण्यास महसूल विभागाने सोमवारी (ता. ६) परवानगी दिली. हे मैदान ओव्हल ट्रस्टकडून महसूल विभागाने पुन्हा ताब्यात घेतले आहे.

राज्य सरकारने क्रॉस मैदान डागडुजी आणि देखभालीसाठी ओव्हल ट्रस्टकडे सोपविल्यानंतर तेथे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई करण्यात आली होती. याविरोधात वेस्टर्न इंडिया सर्कस असोसिएशनने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानुसार क्रॉस मैदानावरील होमगार्डची जागा वगळता सर्कस, प्रदर्शनांसाठी ‘रुल्स फॉर द अलॉटमेंट ऑफ प्लॉटस्‌ ऑन क्रॉस मैदान १९८८’च्या नियमावलीनुसार देण्याचा निर्णय दिला. राज्य सरकारने या आदेशाची अंमलबजावणी करत याबाबतचा आदेश आज जारी केला. ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या काळात प्राधान्याने सर्कससाठी हे मैदान देण्यात येणार आहे; तर जानेवारीत विविध प्रदर्शनांसाठी ते देण्यात येईल.

 हे मैदान सर्कस आणि इतर कार्यक्रमांसाठी द्यावे, या मागणीसाठी सर्कस असोसिएशनने अनेक वर्षे न्यायालयीन लढाई केली. राज्य सरकारकडे पाठपुरावाही केला. असोसिएशनचे अनिल तांडेल म्हणाले की, क्रॉस मैदानात १९७० पासून सर्कस होत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी हे मैदान देखभालीसाठी ट्रस्टला दिल्यानंतर त्याला कुंपण घालून ते बंद करण्यात आले. त्याच्यावर बांधकामही केले. सर्कस व प्रदर्शनांना परवानग्याही नाकारल्या. ओव्हल ट्रस्टला हे मैदान सुशोभीकरण आणि जॉगिंग ट्रॅक करण्यासाठी दिले होते; पण ट्रस्टने अटींचे उल्लंघन केले. उपनगरात बोरिवली, वांद्रे व पवई येथे सर्कस होत असल्या तरी मुंबई शहरातील सर्कसप्रेमी मात्र वंचित होते. आता मुंबई शहरात ११ वर्षांनंतर सर्कस होईल.

Web Title: mumbai news circus