शस्त्रे भाड्याने देणारा मुंबईमध्ये जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - दिवसा आयुर्वेदिक औषधांची विक्री आणि रात्री घातपात- दरोड्यासाठी पिस्तूल, गावठी कट्टे आदी शस्त्रे भाड्याने देणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने आज डोंगरीतून अटक केली. 

मुंबई - दिवसा आयुर्वेदिक औषधांची विक्री आणि रात्री घातपात- दरोड्यासाठी पिस्तूल, गावठी कट्टे आदी शस्त्रे भाड्याने देणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने आज डोंगरीतून अटक केली. 

अब्दुल सत्तार शेख (वय 39) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 67 जिवंत काडतुसे, दोन गावठी कट्टे आणि दोन पिस्तुले जप्त केली आहेत. अब्दुल शेख (मूळ गाव दरभंगा, बिहार) 19 वर्षांपासून डोंगरीच्या नयान धारू स्ट्रीटवरील तांबेवाला बिल्डिंगमध्ये "युनानी हकीम' म्हणून काम करत होता. दोन वर्षांपूर्वी त्याने औषधविक्री सुरू केली होती. तो दिवसा आयुर्वेदिक औषधे विकत असे आणि रात्री शस्त्रे भाड्याने देत असे. ठराविक आणि ओळखीच्या व्यक्तींनाच घातपात आणि लूट करण्यासाठी तो शस्त्रे पुरवत असे. सर्व शस्त्रे त्याने उत्तर प्रदेशातून आणली होती. 

शेखच्या या धंद्याची माहिती काही दिवसांपूर्वी मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. पोलिस त्याच्यावर पाळत ठेवून होते. शेख भाड्याने शस्त्रे देण्यासाठी डोंगरीच्या न्यू बंगाली परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सकाळपासून सापळा लावला होता. शेख शस्त्रांची देवघेव करण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला जेरबंद केले. त्याच्या दुकानातून पोलिसांनी सर्व शस्त्रसाठा जप्त केला आहे; मात्र शेख काही माहिती लपवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. शेखच्या मोबाईलमध्येही काही वादग्रस्त माहिती आढळल्याने त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले.

Web Title: mumbai news Crime