मुख्य आरोपीविरोधात आणखी दोन गुन्हे

अनिश पाटील
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मुंबई - नाशिक येथे जप्त केलेल्या शस्त्रांच्या प्रकरणातील मुख्य आरोपी बद्रीजुम्मन अकबर बादशाह ऊर्फ सुका ऊर्फ पाशा याच्याविरोधात मुंबईत खंडणीसह दोन नवीन गुन्हे रफी किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. खंडणी प्रकरणी अकबर पाशा याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुका हा अकबरचा मुलगा आहे. या दोन्ही प्रकरणांत पोलिस सुका याला ताब्यात घेण्याची शक्‍यता आहे.

अकबर पाशा याचीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असून परिसरातील एका व्यक्तीला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात येणार असून, पुढे सुकाचा ताबाही घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. या गुन्ह्यांमुळे सुकाविरोधात "मोक्का'नुसार गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परिसरावर दहशत बसवण्यासाठी सुका आणि अकबर याने एका व्यक्तीला खंडणीसाठी धमकावले आहे. या प्रकरणी किडवाई मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा करणार आहे.

अकबरला हत्यारांच्या तस्करीप्रकरणी मुंबई पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. 1995 मध्ये त्याच्याविरोधात किडवाई मार्ग पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला होता. याशिवाय वडाळा टीटी आणि किडवाई मार्ग पोलिसांनी अकबरकडून परदेशी बनावटीचे पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, सुरे जप्त केले होते. मनी लॉण्डरिंगच्या गुन्ह्यात माता रमाबाई मार्ग पोलिसांनी अकबरला अटक केली होती. त्याचे अनेक नातेवाईक पाकिस्तानात आहेत. त्याने त्याच्या मुलीचे लग्न पाकिस्तानी युवकाशी लावून दिले आहे. त्यामुळे अकबर अनेकदा पाकिस्तानला जाऊन आल्याचे सांगितले जाते. वडाळा टीटी पोलिसांना एका गुन्ह्यात अकबरचे पाकिस्तानातील "एके-47' हाती घेतलेले छायाचित्र सापडले होते. त्याच्यावर मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यांत दहाहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पोलिस त्याची माहिती गोळा करत आहेत. सुका पाशा याला त्याच्या साथीदारांसह नुकतीच नाशिक पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडे 22 रायफल, 17 रिव्हॉल्व्हर आणि चार हजार 142 काडतुसे सापडली.

बनावट कागदपत्रांप्रकरणी अटक
सुका याने चोरलेल्या गाड्यांची बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यालाही गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता कक्षाने (सीआययू) अटक केली आहे. करीम सय्यद असे त्याचे नाव आहे. तो शिवडी परिसरात राहतो. सुकाने चोरलेल्या गाड्यांची बनावट कागदपत्रे तो त्याच्या घरी बनवत असे. करीमच्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता तिथे बनावट कागदपत्रे, बनावट आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्रांचे साहित्य सापडले. याप्रकरणीही सुका पाशाची चौकशी करण्यात येणार आहे.

Web Title: mumbai news crime