परदेशातील फेसबुक मित्राने डॉक्‍टर महिलेला घातला गंडा 

अनिश पाटील
गुरुवार, 22 जून 2017

मुंबई  -महसूल गुप्तवार्ता विभागाने (डीआरआय) परदेशी चलनासह आपल्याला पकडले असून, अधिकारी आपल्याकडे यातून सुटका करण्यासाठी पाच लाख रुपये मागत असल्याची थाप ठोकून फेसबुकवरील इटलीमधील मित्राने डॉक्‍टर महिलेला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडून या महिलेने दिल्ली व ओडिशातील नऊ खात्यांमध्ये रक्कम जमा केल्याचे भोईवाडा पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

परळमधील एका डॉक्‍टर महिलेची पायरो मेड्रिक जॉन नावाच्या इटलीतील नागरिकासोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. जॉनने या महिलेला आपण महागडी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू पाठवली असल्याचे 24 एप्रिलला सांगितले. त्यानंतर दिल्लीतील सीमाशुल्क विभागातून रवी सिन्हा नावाच्या कथित अधिकाऱ्याचा दूरध्वनी या महिलेला आला. सिन्हाने इलेक्‍ट्रॉनिक वस्तूचे सीमाशुल्क भरण्याच्या नावाखाली महिलेला दिल्लीतील एका खात्यावर 17 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर वस्तू पोहचण्यासाठी पुन्हा अडचण येऊ नये, यासाठी जॉनने आपण स्वतः दिल्लीत आलो असून, ती वस्तू घेऊन येत असल्याचे दूरध्वनीवरून सांगितले. त्यानंतर 4 मे रोजी आपल्याला दिल्लीतील हजरत निझामुद्दीन रेल्वेस्थानकावर परदेशी चलनासह "डीआरआय'ने पकडले असून, यातून सुटका करण्यासाठी अधिकारी पाच लाख रुपये मागत असल्याचे जॉनने सांगितले. त्यामुळे या डॉक्‍टर महिलेने पैसे जमवून त्याने सांगितलेल्या खात्यात जमा केले. त्यानंतर डीआरआयने आपल्याला परदेशात सोडले असल्याचे जॉनने सांगितले. महिलेला यानंतर संशय येऊ लागला; पण तोपर्यंत तिने दिल्लीतील आठ आणि ओडिशातील एका बॅंक खात्यावर असे तब्बल 12 लाख रुपये जमा केले होते. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर अखेर तिने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात जॉन व रवी सिन्हा यांच्यासह नऊ बॅंक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. यामागे देशातीलच टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

Web Title: mumbai news crime Doctor woman