म्हाडाच्या इमारतीतील रहिवासी भीतीच्या छायेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

धारावी - धारावीतील व्ही. के. वाडी येथील नेल्ले महाल सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीतील घर क्रमांक २७ चे छत रविवारी (ता. १६) अचानक कोसळले. या वेळी घरात असलेले पती-पत्नी किरकोळ जखमी झाले. इमारतीला तडे गेले असून, म्हाडाकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने इमारतीतील रहिवासी भीतीच्या छायेत जगत आहेत.

म्हाडाने १९८३ मध्ये बांधलेल्या या पाच माजली इमारतीत ५१ घरे आहेत. २०१४ मध्ये इमारतीचे ऑडिट करण्यात आले होते. त्यात इमारतीतील दोन बीम दुरुस्त करण्याचे सुचवले होते. गतवर्षापासून इमारतीला तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचे पाणी झिरपून घरात गळती लागली आहे. याबाबत म्हाडाकडे तक्रारी केल्यानंतर नोव्हेबर २०१६ मध्ये म्हाडाने इमारत दुरुस्तीचे काम हाती घेतले. इमारतीचे प्लास्टर तोडून अचानक काम बंद केले. ते अद्याप सुरू केलेले नाही. रविवारी घडलेल्या घटनेमुळे इमारतीतील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. कुटुंबासह जीव मुठीत घेऊन दिवस कंठीत आहेत. या घटनेची माहिती म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे कळवली. तरीही म्हाडाने अजूनही त्याची दखल घेतलेली नाही. याबद्दल रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. 

सरकारने लक्ष द्यावे
म्हाडाचे अधिकारी इमारत कोसळायची वाट पाहताहेत का, असा संतप्त सवाल स्थानिक रहिवासी पारी राजन, रतीनम पॉल व सचिन कुंदर यांनी केला आहे. धारावीतील अशा अनेक जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याकडे सरकारने वेळीच लक्ष द्यावे; अन्यथा एखाद्या दुर्दैवी घटनेस सामोरे जाण्याची भीती धारावीत व्यक्त होत आहे.

Web Title: mumbai news Dharavi mhada