बौद्धिक फराळ जीएसटीमुळे महागला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई - दिवाळी काही दिवसांवर आली आहे; मात्र बौद्धिक फराळ समजल्या जाणाऱ्या दिवाळी अंकांना या वर्षी जीएसटी आणि मंदीचा मोठा फटका बसला आहे. काही दिवाळी अंक बंद करण्याची वेळ आली आहे; तर जाहिरातींची संख्या गतवर्षीच्या तुलनेने २५ टक्‍क्‍यांवर आल्याने अंकांच्या किमती ३० ते ५० रुपयांनी वाढल्या आहेत. 

मुंबई - दिवाळी काही दिवसांवर आली आहे; मात्र बौद्धिक फराळ समजल्या जाणाऱ्या दिवाळी अंकांना या वर्षी जीएसटी आणि मंदीचा मोठा फटका बसला आहे. काही दिवाळी अंक बंद करण्याची वेळ आली आहे; तर जाहिरातींची संख्या गतवर्षीच्या तुलनेने २५ टक्‍क्‍यांवर आल्याने अंकांच्या किमती ३० ते ५० रुपयांनी वाढल्या आहेत. 

बाजारातील मंदी आणि त्यात जीएसटीची भर पडल्याने दिवाळी अंकांवर परिणाम झाला आहे. दर्जेदार दिवाळी अंकांसाठी उत्तम मजकूर लागतोच; मात्र छपाईपासून वितरणापर्यंत अंक बनवण्यासाठी जाहिरातीही तितक्‍याच महत्त्वाच्या असतात. त्यावरच अंकाचे ‘अर्थकारण’ अवलंबून असते; मात्र या वर्षी जाहिरातदारांनी हात आखडता घेतल्याने अंकांचा दर्जा कायम राखण्यासाठी ३० ते ५० रुपयांनी किमती वाढवण्यात आल्या आहेत. ‘आवाज’, ‘चंद्रकांत’, ‘धनंजय’ आदी अंकांची किंमत ५० रुपयांनी वाढली आहे. ‘हौस-नवल-मोहिनी’ची किंमतही ३०० वरून ४०० वर पोहचली आहे. काहींनी तर परवडत नसल्याने यंदा दिवाळी अंकाची छपाईच केली नाही. 

दिवाळी अंक वाचवण्याकरिता सरकार स्तरावर कोणतेही विशेष प्रयत्न होताना दिसत नसल्याची खंत अनेक अंकांच्या संपादक - प्रकाशकांनी व्यक्त केली. 

दिवाळी अंक ही आपली सामाजिक बांधिलकीची भावना समजून अनेक जण अंक काढतात; मात्र यंदा जाहिरातींचे प्रमाण कमी झाल्याने अंकांना मोठा फटका बसला आहे. सरकारने याचा विचार केला पाहिजे. अंकाची चळवळ जिवंत राहायला हवी. 
- बी. वाय. पाध्ये (अध्यक्ष, दिवा संघटना) 

‘आवाज’ दिवाळी अंकाला वाचकांकडून मोठी मागणी असते. जाहिरातदारही या अंकासाठी उत्सुक असतात; मात्र या वर्षी मोठा फटका बसला आहे. जाहिरातींची संख्या कमी झाली आहे. जाहिरातदारांवर विसंबून अंक बाजारात आणणार कधी? नाइलाजास्तव अंकाची किंमत वाढवावी लागली.
- भारत पाटणकर (संपादक, आवाज दिवाळी अंक)

दिवाळी अंकांच्या किमती काहीशा वाढल्या आहेत हे खरे आहे; मात्र अंकाच्या निर्मात्यांचाही विचार व्हायला हवा. दर्जेदार मजकूर देण्यासाठी अर्थगणित जुळावे लागते. जीएसटीमुळे ते कोलमडले. अनेक दिवाळी अंक या वर्षी प्रसिद्धच झाले नाहीत असे दिसते. दिवाळी अंकांची संस्कृती टिकवण्याची जबाबदारी आता वाचकांची आहे. 
- हेमंत बागवे (वितरक)

Web Title: mumbai news diwali Magazine GST