मिरवणुका, मोर्चांवर "ड्रोन' लक्ष ठेवणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

मुंबई - घातपात, अनुचित प्रकार रोखण्यासाठी गृहविभागाने आधुनिकीकरणावर भर दिला असून, त्याचाच भाग म्हणून अशा गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत, तर आणखी सात ड्रोनसाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यामधील एक मुंबई पोलिसांना देण्यात येणार आहे.

मुंबई - घातपात, अनुचित प्रकार रोखण्यासाठी गृहविभागाने आधुनिकीकरणावर भर दिला असून, त्याचाच भाग म्हणून अशा गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन ड्रोन खरेदी करण्यात आले आहेत, तर आणखी सात ड्रोनसाठी निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यामधील एक मुंबई पोलिसांना देण्यात येणार आहे.

धार्मिक मिरवणुका आणि मोर्चेही पोलिसांच्या कार्यक्षमतेचा कस लावणारे असल्याने त्यावरही विशेष नजर ठेवण्यात येते. या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉच टॉवरचा उपयोग करण्यात येतो. यापुढे मोर्चा, मिरवणुकांमधील सहभागी नागरिकांची नेमकी संख्या गोळा करण्याबरोबर या गर्दीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन ड्रोनची खरेदी करण्यात आली आहे. त्यांच्या चाचण्याही झाल्या आहेत. त्यांचा वापर नक्षलग्रस्त भागातही करण्यात येणार आहे, अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी दिली. ड्रोनची छायाचित्रे टिपण्याची क्षमता पाच किलोमीटर आहे. विशेष म्हणजे ड्रोनसोबत यूएव्ही (एरिअल वेहिकल) खरेदी करण्यात येणार आहेत. यूएव्हीची क्षमता 15 किलोमीटरची असल्याचे पोलिसांना त्याचा अधिक उपयोग होणार आहे. ड्रोनचा वापर पोलिस तपासात पुरावे म्हणून होऊ शकतो. मुंबई पोलिसांनाही एक ड्रोन दिले जाणार आहे. त्याचा उपयोग अधिवेशनकाळात, मोर्चांमध्ये करण्यात येणार आहे.

बॉंब निकामी करणारा रोबो लवकरच सेवेत
बॉंब निकामी करणाऱ्या रोबोचा समावेश लवकरच पोलिस दलामध्ये करण्यात येणार आहे. राज्याकरिता गृहविभागाने तीन रोबोंची खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्यामधील दोन रोबो मुंबई पोलिस दलाला देण्यात येणार आहेत. या रोबोंची किंमत सुमारे 85 लाख आहे. सध्या त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. संशयास्पद वस्तूची अचूक माहिती ते कॅमेऱ्याद्वारे टिपणार आहेत. अडीच किलोपर्यंत वजन ते उचलू शकतात. कॅमेऱ्यामुळे संशयास्पद वस्तूत नेमके काय आहे याची माहिती पोलिसांना मिळेल. रिमोट कंट्रोलद्वारे ते नियंत्रित करता येणार आहेत. तीव्र क्षमतेची स्फोटके शोधण्यापासून बॉंब निकामी करण्याचे कामही ते करणार आहेत.

Web Title: mumbai news dron watch on rally