उत्तरपत्रिका तपासणीचा गोंधळ संपता संपेना 

नेत्वा धुरी
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई  -उत्तरपत्रिकांची पाने गहाळ असणे, उत्तरपत्रिकांचे संच गायब असणे, भलत्याच विषयांच्या उत्तरपत्रिका येणे आदी तक्रारी कमी होण्याऐवजी त्यांची संख्या वाढत असल्याने भवन्स महाविद्यालयाच्या तपासणी केंद्रात येणारे प्राध्यापक राज्यपालांकडे तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहेत. 

भवन्सच्या उत्तरपत्रिका तपासणी केंद्रात सुरवातीपासूनच भलत्याच विषयाच्या उत्तरपत्रिका तपासायला येत असल्याची तक्रार प्राध्यापकांनी केली होती. त्यानंतर हा गोंधळ थांबण्याऐवजी सुरूच आहे. भवन्समधील उत्तरपत्रिका तपासणी केंद्रात एकच पानी उत्तरपत्रिका संगणकाच्या स्क्रीनवर येत असल्याच्या प्रकाराने प्राध्यापक हैराण झाले आहेत. उत्तरपत्रिका स्कॅन करण्यासाठी त्यांची पाने वेगवेगळी करण्यात आली. असे करताना काही पाने गहाळ झाली असण्याची शक्‍यता प्राध्यापक व्यक्त करीत आहेत. 

उत्तरपत्रिकांची पाने गहाळ होत असल्याने विद्यार्थ्यांच्या निकालावर आणि पर्यायाने त्यांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याशिवाय विद्यापीठापुढे पर्याय राहणार नाही. 

तीन वर्षांची पुनरावृत्ती 
विद्यापीठाने पहिल्यांदा ऑनस्क्रीन पेपर तपासणी प्रक्रिया तीन वर्षांपूर्वी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सुरू केली. त्या वेळीही संबंधित विद्यार्थ्यांच्या सगळ्याच उत्तरपत्रिकांची पाने गहाळ झाल्याचे प्रकरण गाजले होते. पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्यात आले होते. आताही गोंधळ वाढल्यास विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण केले जाईल, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे. 

Web Title: mumbai news exam paper checking