स्कायवॉकवर सुविधांचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

वडाळा - प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबईत अनेक ठिकाणी स्कायवॉक बांधण्यात आले; मात्र स्कायवॉकवर दिवसेंदिवस सुविधांचा अभाव आणि फेरीवाले, भिकारी, चोर, गर्दुल्ले यांचे वास्तव्य वाढल्याने स्कायवॉकवरून प्रवास करणे धोक्‍याचे झाले आहे. वडाळा पूर्वकडे रेल्वेस्थानकाच्या पादचारी पुलाला जोडून बांधलेल्या स्कायवॉकवर सहा महिन्यांपासून दिव्यांची सोय नसल्याने प्रवाशांना प्रवास करणे गैरसोयीचे झाले आहे. 

एमएमआरडीएने अंदाजे ४१ कोटी खर्च करून वडाळा पूर्वेला जोडणारा स्कायवॉक बांधला. या स्कायवॉकची व्यवस्थित देखभाल होत नाही. सहा महिन्यांपासून दिवे बंद असल्याने प्रवाशांना अंधारातून वाट काढत जावे लागते. स्कायवॉकवर सुरक्षा रक्षक नसल्याने चोर, गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. महिलांना प्रवास करणे कठीण व असुरक्षित झाले आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन स्कायवॉकवर त्वरित दिवाबत्तीची व्यवस्था करून, फेरीवाले व भिकारी यांच्या तावडीतून हा स्कायवॉक मोकळा करण्याची मागणी शिवमुद्रा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी केली आहे.

स्कायवॉकवर दिवाबत्ती नसल्यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. हा स्कायवॉक एमएमआरडीएने अद्याप पालिकेला हस्तांतरित केलेला नाही. स्कायवॉकची स्वच्छता पालिकेच्या वतीने रोज करण्यात येते.
- केशव उबाळे, सहायक आयुक्त, एफ उत्तर विभाग.

Web Title: mumbai news facilities Skywalk