चव्हाण मैदान संस्थेला देणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

नवी मुंबई - फिफाच्या धर्तीवर जागतिक संघाच्या खेळाडूंना सराव करण्यासाठी तयार केलेले यशवंतराव चव्हाण मैदान फिफानंतर स्वयंसेवी संस्थेला चालवण्यासाठी देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार तयार केलेल्या मैदानाच्या देखभालीवर महिन्याला दोन लाख खर्च येणार आहे. तो खर्च भरून काढून मैदानाचा दर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न पालिका करील, असे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सांगितले.

नवी मुंबई - फिफाच्या धर्तीवर जागतिक संघाच्या खेळाडूंना सराव करण्यासाठी तयार केलेले यशवंतराव चव्हाण मैदान फिफानंतर स्वयंसेवी संस्थेला चालवण्यासाठी देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार तयार केलेल्या मैदानाच्या देखभालीवर महिन्याला दोन लाख खर्च येणार आहे. तो खर्च भरून काढून मैदानाचा दर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न पालिका करील, असे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सांगितले.

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचे सामने खेळण्यासाठी येणाऱ्या संघांना सराव करण्यासाठी महापालिकेने सेक्‍टर १९ येथील यशवंतराव चव्हाण हे मैदान तयार केले होते. जागतिक पातळीवरील फुटबॉलचे खेळाडू येणार असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा मिळावी यासाठी महापालिकेने सुमारे एक कोटी ९० लाख खर्च केले; परंतु फिफा संपल्यानंतर पुन्हा हे मैदान ओस पडून त्याची दुर्दशा होणार नाही यासाठी महापालिकेकडून आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मैदानावर आलेले बर्मुडा गवत व त्याखालील पाणी शोषणारी वाळू तशीच टिकून राहावी यासाठी हे मैदान भाडेतत्त्वावर स्वयंसेवी संस्थेला चालवायला देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मैदानाचा दर्जा सांभाळण्यासाठी दरमहा खर्च दोन लाख रुपये असणार आहे. हा खर्च भरून निघण्यासाठी मैदान भाड्याने देण्यात येणार आहे. सध्या इतर खासगी संस्थांकडून आकारला जाणाऱ्या दराची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार महापालिकेचे दर ठरवले जाणार असून, वाजवी दरात यशवंतराव चव्हाण मैदान खेळासाठी भाड्याने दिले जाणार आहे. हे मैदान महापालिकेच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पूर्णपणे मोफत असून, खासगी शैक्षणिक संस्थांना भाड्यात ५० टक्के सूट देण्याचे विचाराधीन आहे. यात मैदानात पाणी शोषून घेणारी वाळू, बर्मुडा गवत, शोषलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मैदानाखाली अद्ययावत ड्रेनेज लाईन अशा विविध प्रकारच्या सुविधा प्रदान केल्या आहेत. तसेच मैदानाशेजारी खेळाडूंना ड्रेसिंग रूमदेखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिवाय मैदानावर सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून हायमास्ट बसवण्यात आले आहेत. मैदानावर दिलेल्या दर्जेदार सुविधेमुळे न्यूझीलंडच्या संघाने तब्बल दोन वेळा सराव करून मैदानाचे कौतुक केले.

मैदानाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी मैदान महिन्यातून दोन वेळा बंद ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियुक्त केल्या जाणाऱ्या संस्थेला मशीन पुरवणे अथवा किती भाडे आकारणे याबाबत विचार सुरू आहे. मैदान चालवण्यासाठी देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेसमोर ठेवला जाणार आहे. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त

क्रिकेटचे काय?
यशवंतराव चव्हाण मैदानावर नेरूळ भागातील मुले क्रिकेट खेळण्यासाठी येत असतात; परंतु या ठिकाणी फुटबॉलचे मैदान तयार केल्याने क्रिकेटचा खेळ अडचणीत आला आहे. त्यामुळे मैदानाच्या एका बाजूला क्रिकेट खेळण्यासाठी मुभा मिळावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

Web Title: mumbai news fifa