प्लास्टिकचा भस्मासुर गाडण्यासाठी मंडळेही सरसावली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

‘प्रबोधन’चाही सहभाग
प्रबोधन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या फलके यांनीही प्लास्टिकविरोधी मोहिमेला पाठिंबा दिला. त्या म्हणाल्या, की आमच्या शाळेत नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात. प्लास्टिक निसर्गाला कसे घातक आहे हे आम्ही रोज मुलांना सांगत असतो. आम्ही प्लास्टिकविरोधी पथनाट्यही बसवले आहे. दर वर्षी आम्ही नागपंचमीच्या निमित्ताने मातीचे नाग मुलांकडून बनवून घेतो. पर्यावरणपूरक सण आम्ही मुलांना साजरे करायला सांगतो. ‘सकाळ’च्या मोहिमेत आम्ही नक्कीच सहभाग घेऊ.

मुंबई - यंदाच्या गणेशोत्सवात ‘सकाळ’ राबविणार असणाऱ्या प्लास्टिकविरोधी लढ्याला बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी मोहिमेसाठी ‘सकाळ’ला सर्वतोपरी साह्य करण्याची ग्वाही दिली आहे.

‘सकाळ’ने गणेशोत्सवातच नव्हे तर एरवीही अनेक समाजहिताचे उपक्रम राबविले आहेत. त्यांचे उपक्रम स्तुत्य असून सर्वच मंडळांनी ते राबविले पाहिजेत. मुंबईतील बरीच मंडळे वर्षभर आपापल्या परीने समाजसेवा करीत असतात. सामाजिक उपक्रमही राबवितात. मात्र, त्यातूनही ‘सकाळ’च्या उपक्रमांचे वेगळेपण, त्यांचा व्यापक दृष्टिकोन व त्यामागील सामाजिक बांधिलकी उठून दिसत असल्याने सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व सामान्य नागरिकांनीही त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन दहीबावकर यांनी केले. प्लास्टिकचे धोके सर्वांनाच माहीत आहेत. प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे-नाले तुंबून मुंबई जलमय होते. प्लास्टिकचे विघटन एक मोठी समस्या झाली आहे. प्लास्टिकच्या धोक्‍याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधून एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण सर्वांनीच प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे. प्लास्टिकविरोधात सरकारने कायदा करणे हा एक भाग आहे; पण नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने प्लास्टिकचा वापर टाळून त्याऐवजी अन्य पर्यावरणपूरक साहित्य वापरले पाहिजे. तसे झाले तर आपोआपच प्लास्टिकचा भस्मासुर गाडला जाईल. ‘सकाळ’ची मोहीम अनुकरणीय आहे, असेही दहीबावकर यांनी सांगितले. 

‘सकाळ’ने याआधी गणेशोत्सवादरम्यान राबविलेल्या पोलिसांसाठीचा तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम, जलपूजनाची जलदिंडी, वे टू ॲम्ब्युलन्स आदी कार्यक्रमांना समितीने पाठिंबा दिला होता. 

निसर्ग बिघडवणाऱ्या गोष्टी हद्दपार करा 
गणेशोत्सव हे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे. त्यात समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या सर्वांनाच समितीचा नेहमीच पाठिंबा असतो. मुंबईतील नैसर्गिक नद्या व छोटे तलाव दिवसेंदिवस आक्रसत चालले आहेत. त्यामुळे काही दिवसांनी शहरात केवळ नालेच उरतील, अशी स्थिती आहे. मुंबापुरीला अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. त्याबाबत गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे ही काळाची व मुंबई शहराचीही गरज आहे. त्यामुळे आपल्या शहराचा निसर्ग बिघडवणाऱ्या या गोष्टी आपणच हद्दपार करायला हव्यात, असेही नरेश दहीबावकर म्हणाले.

Web Title: mumbai news ganeshotsav plastic