घणसोलीतील वाट बिकट

घणसोलीतील वाट बिकट

कोपरखैरणे - सिडकोने नवी मुंबई पालिकेकेडे हस्तांतरित केलेला घणसोली हा सर्वात शेवटचा नोड. उलवे नोड विकसित होण्यापूर्वी सिडकोचे येथील विकासकामात लक्ष होते, परंतु नंतर नैना आणि खास करून आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प सुरू झाल्यानंतर सिडकोचे घणसोलीत पायाभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत होता. त्यामुळे एकीकडे इमले उभे राहत असताना पायाभूत सुविधांचा बोजवारा उडत होता. त्यात सर्वांत गंभीर समस्या बनली ती पार्किंगची. येथील गावठाणात चिंचोळे रस्ते असल्याने तेथील वाहनधारकांनाही कसरत करावी लागत आहे.

घणसोलीत वाहतूक कोंडी होणारी अनेक ठिकाणे असली, तरी सर्वाधिक वाहतूक कोंडी रेल्वेस्थानक परिसरात होते. तेथे पार्किंगची मोठी समस्या आहे. सेक्‍टर- ७ मध्येही मोठ्या प्रमणात बेकायदा पार्किंग होते. हा परिसर मार्केट परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी शू मार्ट, मेडिकल, दवाखाने, स्वीट मार्ट व इतर दुकाने आहेत. त्यामुळे येथे कायम गर्दी असते. याच मार्केटमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या वाहतूक कोंडीत रिक्षाचालकाने एनएमएमटी बसचालकाला मारहाण केली होती. यावरून येथील वाहतूक कोंडीची समस्या कोणत्या स्तराला गेली आहे याची कल्पना येते. 

घणसोली गावात सर्वत्रच पार्किग समस्या आहे. त्यातही दगडू चाहू पाटील चौकातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. चिंचोळ्या गल्ल्या आणि दुसरीकडे आलिशान गाड्या उभ्या असल्याने येथे नेहमी वाहतूक कोंडी असते. घणसोली गाव आणि घणसोली सेक्‍टरला जोडणाऱ्या जुन्या चिंचोळ्या रस्त्यावर येथे रात्री एमआयडीसीतील ट्रक, टॅंकर आणि कंटेनर उभे असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येतात. याव्यतिरिक्त वाहतूक कोंडी कायम असते ती घणसोली-रबाळे रोडवर. हा रस्ता खूपच चिंचोळा आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या वाढल्याने हा रस्ता अपुरा पडतो. 

या नोडमधील महत्त्वाच्या ठिकाणी ‘सम विषम’ पार्किंग आहे. तसे तेथे फलक लावले आहेत. परंतु त्यानंतरही तेथे बेकायदा पार्किंग केले जाते. वाहतूक पोलिस सातत्याने कारवाई करत नसल्याने बेकायदा पार्किंग करणाऱ्या चालकांचे फावते.

कोंडीची कारणे
 उंच टॉवर, पार्किंगचा बोजवारा. 
 पार्किंगसाठी भूखंड नाही. 
 बेकायदा बांधकामे पार्किंग समस्येला कारणीभूत.
 पोलिस बळ कमी असल्याने कारवाईत अडचणी.
 टोईंग व्हॅनची कमतरता. 
 गावठाणात पार्किंगसाठी जागेचा अभाव.  

घणसोली नोडमध्ये बहुतांश ठिकाणी वाहतूक कोंडी होते ती बेकायदा व बेशिस्त पार्किंगमुळे. येथे पार्किंगसाठी जागेचा अभाव आहे. आम्ही दिलेल्या सूचनेप्रमाणे महापालिकेने ठिकठिकाणी सम विषम पार्किंग व नो पार्किंग केले आहे. बेकायदा पार्किंगबाबत आम्ही वेळोवेळी कारवाई करीत असतो.
- प्रदीप माने, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक)

हा नोड नुकताच पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे. पार्किंगची समस्या काही ठिकाणी गंभीर असली, तरी वाहतूक विभागाच्या सूचनेनुसार आम्ही पावले उचलत आहोत. सिडकोने पार्किंगसाठी भूखंड आरक्षित ठेवला आहे किंवा नाही, याची माहितीही घेत आहोत.
- दत्तात्रय नागरे,  पालिका विभाग अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com