धावत्या लोकलमधून घाबरलेल्या मुलीची उडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - महिलांच्या डब्यात घुसलेल्या 35 वर्षीय पुरुषाने लगट करण्याचा प्रयत्न करताच 14 वर्षीय मुलीने रविवारी (ता. 22) चालत्या लोकलमधून उडी मारली. या मुलीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

मुंबई - महिलांच्या डब्यात घुसलेल्या 35 वर्षीय पुरुषाने लगट करण्याचा प्रयत्न करताच 14 वर्षीय मुलीने रविवारी (ता. 22) चालत्या लोकलमधून उडी मारली. या मुलीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

आठवीत शिकणारी ही मुलगी रविवारी सकाळी परळ येथे खासगी शिकवणीला जात होती. तिने सीएसटीला कल्याण लोकल पकडली. लोकल सुरू होताच एक पुरुष महिलांच्या डब्यात घुसला. मुलीने त्याला हटकले आणि महिलांचा डबा असल्याचे सांगितले; परंतु त्याने तिला धमकावून गप्प बसण्यास सांगितले. त्यामुळे ती घाबरली आणि लोकलच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिली. आरोपीही तिच्याजवळ आला आणि तिच्याशी लगट करू लागला. तिने लोकलची साखळी खेचण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

त्याचवेळी रुळांवर काम करणाऱ्या गॅंगमनना तिने पाहिले आणि बचावासाठी चालत्या लोकलमधून उडी मारली. गॅंगमनने तिला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या जबाबानंतर सीएसटी रेल्वे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. स्थानकावरील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपीचा माग काढत आहेत.

डब्यात अश्‍लील हावभाव
नालासोपारा येथील 25 वर्षीय तरुणी शनिवारी (ता. 21) मुंबई दर्शन करण्यासाठी सीएसटीला येत असताना तिला पाहून अश्‍लील हावभाव करणाऱ्या आरोपीचाही पोलिस शोध घेत आहेत. महिला डब्याला लागून असलेल्या डब्याच्या ग्रील्समधून एक तरुण या तरुणीकडे पाहून अश्‍लील चाळे करत होता. मुलीने धाडसाने मोबाईलवर त्याचे चित्रीकरण केले. सीएसटीला आल्यानंतर तिने या प्रकाराची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Web Title: mumbai news girl jump in local