'हेक्‍टरी 50 हजारांची मदत गारपीटग्रस्तांना द्यावी'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांच्या हजारो हेक्‍टरवरील रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्‍टरी किमान 50 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात तुपकर यांनी म्हटले आहे, की विदर्भ-मराठवाड्यात राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, गहू, हरभरा, तूर, भाजीपाला व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. या अस्मानी संकटामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारने कपाशीवरील बोंड अळीच्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली होती; मात्र अद्यापही हे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. सरकारच्या या घोषणेवर आता आमचा विश्‍वास नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने मदत जमा करावी.

Web Title: mumbai news hailstorm affected help ravikant tupkar