गोरेगावपर्यंत हार्बरची चाचणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई - हार्बर मार्गाचा अंधेरीपासून गोरेगावपर्यंत विस्तार करण्याच्या प्रकल्पातील दोन लोहमार्ग सज्ज झाले आहेत. आता तिथे प्रत्यक्ष डिझेल इंजिन व मालगाड्या चालवून चाचण्याही सुरू झाल्या आहेत; मात्र अजून प्रत्यक्ष फलाटांवरील काही कामे शिल्लक असल्याने लोकल सुरू होण्यासाठी प्रवाशांना आणखी दोन महिने तरी वाट पाहावी लागेल, अशी चिन्हे आहेत.

मुंबई - हार्बर मार्गाचा अंधेरीपासून गोरेगावपर्यंत विस्तार करण्याच्या प्रकल्पातील दोन लोहमार्ग सज्ज झाले आहेत. आता तिथे प्रत्यक्ष डिझेल इंजिन व मालगाड्या चालवून चाचण्याही सुरू झाल्या आहेत; मात्र अजून प्रत्यक्ष फलाटांवरील काही कामे शिल्लक असल्याने लोकल सुरू होण्यासाठी प्रवाशांना आणखी दोन महिने तरी वाट पाहावी लागेल, अशी चिन्हे आहेत.

नव्या मार्गावर गोरेगाव हे सध्या तरी टर्मिनस असेल अशी योजना आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादन कामात जोगेश्‍वरी फाटकाजवळ तसेच राममंदिर रोड फाटकाजवळ असे दोन अडथळे होते. मृणालताई गोरे उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर राममंदिर रोडचे फाटक बंद झाले, तर जोगेश्‍वरीच्या फाटकाजवळची जमीन न्यायालयीन लढ्यानंतरच मिळाली. जमीन मिळाल्यावर सर्वप्रथम दोन  लोहमार्ग टाकण्यात आले. ते काम पावसाळ्यापूर्वी मे-जून महिन्यांत पूर्ण झाल्यावर जुलैमध्ये त्या मार्गाच्या चाचण्या सुरू झाल्या. प्रथम रेल्वेसारखी लोखंडी चाके असलेला ट्रक तेथून चालविण्यात आला. त्यानंतर त्यात वजनही टाकून ट्रक चालला. मागील आठवड्यात तिथे डिझेल इंजिन आणि वजन भरलेली मालगाडीही चालविण्यात आली. आता दोन लोहमार्ग सज्ज झाले असून विद्युतीकरणाचे काम झाले की ते सुरू होतील; पण येथील फलाट पूर्णपणे सज्ज करण्याचे काम शिल्लक आहे. 

गोरेगाव आणि जोगेश्‍वरीतील फलाट संपूर्ण बांधले असले तरी तेथील काही सोई अपूर्ण आहेत. राम मंदिर रोडच्या दक्षिण टोकाकडील फलाट आता जेमतेम बांधण्यात आला आहे. सुमारे तीन डबे उभे राहतील एवढ्या भागाच्या या फलाटावर छतदेखील नाही. त्याच्यावरील कोबा व फरशाही अद्याप टाकण्यात आलेल्या नाहीत. या सर्व फलाटांवरील इंडिकेटर, नामफलक, दिवे आदी काही कामे शिल्लक आहेत.

कामे तातडीने करण्याचे आव्हान
गोरेगावला नव्या फलाटांवरील एस्केलेटर व पूल सज्ज आहेत; पण एका फलाटावरील लिफ्ट अजून सुरू नाही. जोगेश्‍वरीचे भुयारी मार्गही बांधून तयार आहेत. राम मंदिर रोडवरील पूल व प्रवेशद्वारे तयार आहेत. गोरेगावलाही दोन प्रवेशद्वारे तयार आहेत; परंतु दोघांचे काम अजून शिल्लक आहे. त्यामुळे राहिलेली कामे त्वरेने पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वेसमोर आहे.

Web Title: mumbai news Harbor line railway