मुंबईला पावसाने झोडपले; ठिकठिकाणी साचले पाणी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

मुंबईः मुंबईला आज (मंगळवार) पावसाने झोडपून काढले असून, रस्त्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. मुंबईच्या पावसाबाबत सोशल नेटवर्किंगवर अनेकजण माहिती टाकत असून, घराबाहेर पडण्याची आवश्यकता असेल तर बाहेर पहा अन्यथा घरातच थांबा, असा सल्लाही अनेकजण देत आहेत.

मुंबईः मुंबईला आज (मंगळवार) पावसाने झोडपून काढले असून, रस्त्यासह ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. मुंबईच्या पावसाबाबत सोशल नेटवर्किंगवर अनेकजण माहिती टाकत असून, घराबाहेर पडण्याची आवश्यकता असेल तर बाहेर पहा अन्यथा घरातच थांबा, असा सल्लाही अनेकजण देत आहेत.

मुंबईमध्ये सोमवारी (ता. 28) रात्रीपासून पाऊस पडत आहे. मुंबईकरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र विविध भागात दिसत होते. पावसामुळे रेल्वेसह विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे

बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बीकेसी, माहीम, दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, कुलाबा, भायखळा, लालबाग, परळ, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि मुलुंड येथे पावसाने धुमाकूळ घातला. दादरच्या हिंदमाता येथे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्या परिसरातील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे. पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवरही झाला असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक अपघातामुळे कोलमडले आहे. गेल्या चोवीस तासात शहरात 79.89 मिलीमीटर, पूर्व उपनागरात 81.36 मिलीमीटर तर पश्चिम उपनागरात 65.54 मिलीमीटर इतका पाउस पडला आहे. पहाटे समुद्राला मोठी भरती होती, समुद्रात 4.52 मिटरच्या लाटा उसळल्या होत्या.14 ठिकाणी शार्ट सर्किटच्या घटना घडल्या तर 23 ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रानी दिली,. शीव आणि माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी भरल्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल पुढील सुचना मिळेपर्यंत थांबविल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या लोकल पंधरा ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

Web Title: mumbai news Heavy rains lash Mumbai