रुग्णालयात औषधे, रक्ताचा तुटवडा? 

रुग्णालयात औषधे, रक्ताचा तुटवडा? 

मुंबई - शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात रक्ताचा आणि औषधांचा तुटवडा असल्याचे तेथील विद्यार्थी डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. रक्ताचा तुटवडा असल्याने रुग्णांना बाहेरून रक्त आणण्यासाठी सांगणाऱ्या डॉक्‍टरला मिळालेल्या इशाऱ्यानंतर डॉक्‍टरांनीच रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रुग्णालयात डॉक्‍टरांनी रक्‍तदान शिबिर घेतले. 

शीव रुग्णालयात डेंगी झालेल्या एका रुग्णाला चढवण्यासाठी रुग्णालयात प्लेटलेटस्‌ नसल्याने एका निवासी डॉक्‍टरने चिट्ठी लिहून बाहेरून प्लेटलेट आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले. याबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली होती. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी निवासी डॉक्‍टरला याबाबत इशारा दिला होता. 

त्या वेळी रुग्णालयात रक्त, औषधे आणि इतर साहित्याचा तुटवडा असल्याचे विद्यार्थी डॉक्‍टरांनी रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. रुग्णालयाचे जनरल सेक्रेटरी डॉ. हर्षल महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाच्या क्रमांक सहा वॉर्डला साहित्याचा तुटवडा आहे. 

रक्त नसल्याने विद्यार्थी डॉक्‍टरांनी रुग्णालयात रक्त आणि इतर घटक उपलब्ध व्हावेत यासाठी रक्तदान शिबिर घेतले होते. त्याद्वारे रुग्णालयात 78 पिशव्या रक्त उपलब्ध करून देण्यात आले; मात्र औषधोपचाराचे इतर साहित्य नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांच्या संतापाला निवासी डॉक्‍टरांना सामोरे जावे लागणार आहे. त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. जयश्री मोंडकर सुट्टीवर असल्याने त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले; तर उपायुक्त धामणे यांनीही माहिती नसल्याचे सांगितले. महापालिका प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश सुपे रजेवर असल्याने धामणे यांच्याकडे संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. 

विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेच्या इतर रुग्णालयातही औषधांचा आणि साहित्याचा तुटवडा जाणवत आहे. केईएम रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजीव सातवकर यांनी रुग्णालयात असा तुटवडा नसल्याचे सांगितले. 

विद्यार्थ्यांचा पुढाकार 
शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील विद्यार्थ्यांनी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून विद्यार्थी आणि त्यांच्या रक्तगटाची माहिती रक्तपेढीला देण्याचा निर्णय घेतला आहे. आवश्‍यकतेवेळी संबंधित रक्तगटाच्या विद्यार्थ्यांना रक्तदानासाठी बोलावण्यास मदत होईल, असे डॉक्‍टर हर्षल महाजन यांनी सांगितले. डॉ. महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात एमबीबीएसचे 650; तर पदव्युत्तर शिक्षण घेणारे 450 डॉक्‍टर आहेत. या मोहिमेतून 1000 डॉक्‍टर रक्तदात्यांची यादी रुग्णालयाला उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com