मुंबईतील 4,732 हाऊसिंग सोसायट्यांना अग्निसुरक्षा नोटिसा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - कमला मिल अग्निकांडानंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने अग्निसुरक्षेचा नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा आदेश दिला आहे. अग्निशमन दलाने मुंबईतील तब्बल 4,732 गृहनिर्माण सोसायट्यांना त्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे वाढीव बांधकामे, अग्निसुरक्षेच्या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होण्याची दाट शक्‍यता आहे. 

मुंबईतील अतिक्रमणांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. कमला मिल आग दुर्घटनेनंतर अग्निसुरक्षेबाबतचा प्रश्‍न ऐरणीवर आला. आतापर्यंत सुमारे पाच हजार आस्थापनांतील अतिक्रमणांवर पालिकेने कारवाई केली आहे. आस्थापनांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाच आता गृहनिर्माण सोसायट्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

या पार्श्‍वभूमीवर जानेवारी 2015 ते डिसेंबर 2017 या तीन वर्षांत अग्निशमन सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 4,732 गृहनिर्माण सोसायट्यांना पालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत. नोटीस मिळाल्यापासून 120 दिवसांच्या आत सोसायट्यांना सुरक्षा नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. यानंतरही नियमांचे पालन न केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल. या कायद्यानुसार अग्निसुरक्षा नियमांचे पालन न केल्यास 20 ते 50 हजार रुपये दंड होईल; तसेच तीन वर्षांपर्यंत शिक्षाही होऊ शकते. 

इमारतीतील अग्निशमन यंत्रणेबाबत दर सहा महिन्यांनी ऑडिट करून ते अग्निशमन दलाकडे जमा करणे आवश्‍यक आहे; मात्र अनेक सोसायट्या त्याबाबत दुर्लक्ष करीत आहेत. सोसायट्यांनी ऑडिट अधिकृत एजन्सीकडून करावेत, असा नियम आहे. राज्यभरात अशा 588 परवानाधारक एजन्सी आहेत. यापैकी 240 एजन्सी मुंबईत आहेत. 

नवे सॉफ्टवेअर 
इमारतींमध्ये अग्निशमन सुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, हे इमारतींमध्ये न जाताही कळू शकेल असे नवे सॉफ्टवेअर सुरू केले जाणार आहे. त्यामुळे यापुढे नियम धाब्यावर बसवणाऱ्या इमारतींना चाप बसेल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. 

Web Title: mumbai news housing societies Fire Safety Notices