INSIDE STORY : तात्काळ बंद करण्याच्या नोटीसा दिलेले रुग्णालये सुरुचं ; अनधिकृत रुग्णालयांवरील कारवाईस टाळाटाळ

INSIDE STORY : तात्काळ बंद करण्याच्या नोटीसा दिलेले रुग्णालये सुरुचं ; अनधिकृत रुग्णालयांवरील कारवाईस टाळाटाळ

मुंबई : महाराष्ट्र नर्सिंग ऍक्‍टनुसार नोंदणी परवाना नसल्यामुळे मुंबईतील 36 रुग्णालयांना तातडीने बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या; मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही या रुग्णालयांवर कुठलीच कारवाई झालेली नाही. "सकाळ'ने यापैकी काही रुग्णालयांची पाहणी केली असता जवळपास 70 टक्के रुग्णालये बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या रुग्णालयांवर कारवाई करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर अग्निशमन दलाने मुंबईतील जवळपास दीड हजार रुग्णालयांची तपासणी केली. त्यामध्ये मुंबईतील 36 रुग्णालयांकडे महाराष्ट्र नर्सिंग ऍक्‍टनुसार नोंदणी परवाना नसल्याचे निदर्शनास आले. सदर रुग्णालये तातडीने बंद करण्यास अग्निशमन दलाने पालिका आरोग्य अधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्याला पत्र पाठवले होते; मात्र संबंधित प्रशासनाने अग्निशमन दलाच्या पत्राची दखल घेतली नाही. आम्हाला पत्र मिळाले असून लवकरच कारवाई करण्यात येईल, असे नेहमीच्या पठडीतील उत्तर देण्यात आले; तर अनेक रुग्णालयांनी अग्निसुरक्षा उपाययोजना करण्याचे आणि नर्सिंग परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केल्याचे सांगितले. 

1. अंधेरी : 

अंधेरीच्या मरोळ येथील "कोडलेस इन केअर' या रुग्णालयाची 4 फेब्रुवारीला अग्निशमन दलाने तपासणी केली. रुग्णालयात अग्निसुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास आल्याने उपाययोजना करण्यापर्यंत रुग्णालये बंद ठेवण्याची नोटीस बजावली गेली होती; मात्र "सकाळ'च्या पाहणीत सदर रुग्णालय सुरूच असल्याचे दिसले. रुग्णालयातील डॉ. आतिष लडाड यांना विचारले असता कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे सादर केल्याचे सांगितले. याबाबत समता नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित रुग्णालयावर कारवाईचे आदेश मुंबई महापालिकेकडून मिळाले आहेत. त्यानुसार लवकरच कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

वडाळा परिसरातील रुग्णालयांची 13 ते 20 जानेवारीपर्यंत तपासणी करण्यात आली. त्यातील सात रुग्णालयांना तात्काळ बंद करण्याच्या सूचना अग्निशमन दलाने दिल्या होत्या. त्यानुसार ऍण्टॉप हिल भागातील पूजा नर्सिंग होम 13 जानेवारीला; तर ज्योती पॉलीक्‍लिनिक ऍण्ड नर्सिंग होम 20 तारखेला बंद करण्याचे पत्र संबंधित प्रभागातील आरोग्य अधिकारी आणि पोलिस ठाण्याला देण्यात आले. सातपैकी दोन रुग्णालयांनी नोटीस मिळाल्याचे मान्य केले. तसेच ज्योती पॉलीक्‍लिनिकचे डॉ. अशोक मिश्रा यांनी पालिकेला कागदपत्रे जमा केल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला; तर पूजा नर्सिंग होमचे डॉ. जालन शाह यांनी दोन ते तीन दिवसांत अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय भायखळ्याच्या मातोश्री नर्सिंग होमचे डॉ. सुभाष जैन यांनी रुग्णालय नोंदणीचा परवाना नूतनीकरणासाठी कागदपत्रे जमा केली असून तोपर्यंत रुग्णालय बंद ठेवल्याचे सांगितले. 

3. गोवंडी-मानखुर्द 

अग्निशमन दलाच्या तपासणीत गोवंडी, मानखुर्द परिसरातील सर्वाधिक 13 रुग्णालये बेकायदा सुरू असल्याचे आढळले होते. ट्रॉम्बे भागातील ज्युपिटर हॉस्पिटल डायग्नॉस्टिक सेंटर, मानखुर्द भागातील भद्रा नर्सिंग होम, विश्‍वकर्मा हॉस्पिटल, न्यू लोटस हॉस्पिटल ही रुग्णालये 25 जानेवारीला बंद करण्याची शिफारस केली होती; मात्र ही सर्व रुग्णालये बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे आढळले. यासंदर्भात अग्निशमन दलाचे पत्र मिळाले असून पालिकेने कारवाई करण्यास सांगितल्यास निश्‍चितपणे केली जाईल, असे ट्रॉम्बे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिद्धेश्‍वर गोवे यांनी सांगितले. तसेच संबंधित रुग्णालयांवर कारवाईची मोहीम सुरू असल्याचे एम पूर्वचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश नौनी यांनी सांगितले. 

मुंबईतील 36 रुग्णालयांकडे नर्सिंग परवाना नसल्यामुळे ती तातडीने बंद करण्याच्या सूचना आम्ही संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. - कैलास हिवराळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई 

अग्निशमन दलाचा अहवाल मिळाला असून संबंधित रुग्णालये आणि नर्सिंग होमला उपाययोजनांची पूर्तता करण्यासाठी मुदत दिली आहे. त्या कालावधीत कागदपत्रांची पूर्तता न केल्यास पालिका कारवाई करणार आहे. - सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक रुग्णालयांना परवाने नूतनीकरणासाठी अडचणी येत आहेत. शिवाय नोंदणी शुल्क वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे आर्थिक अडचणीही आहेत; मात्र परवानेच नसलेल्या रुग्णालयांवर निश्‍चितपणे कारवाई केली पाहिजे. - डॉ. अविनाथ भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र 

mumbai news illegal hospitals are still operating even after getting closure notice from BMC


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com