अधिकाऱ्यांच्या संगनमताने डोंबिवलीत अनधिकृत टॉवर बांधकामे जोरात

संजीत वायंगणकर
सोमवार, 24 जुलै 2017

शेवटी हे प्रकरण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सांगितल्यावर त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या अधिवेशनात लक्षवेधी मांडून अशा प्रकारे विकासकांकडून फसगत झालेल्या डोंबिवलीकरांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.

डोंबिवली- सरकारी नियमांचा भंग करून नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने डोंबिवलीत अनधिकृत टॉवर बांधकामे जोरात आहेत. अशाच एका टॉवरमध्ये सदनिका घेऊन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पांडुरंग भोईर यांनी या प्रकरणी सर्व संबंधित शासकीय कार्यालयात एकाकी लढा देऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु भ्रष्ट व्यवस्थेमुळे न्याय मिळण्याऐवजी जीवितास धोका निर्माण झाल्याने ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना लेखी तक्रार करण्यात आली. तरीही कोणतीही कारवाई होत नसल्याने माझ्या जीवितास धोका वाढला आहे, असे भोईर यांचे म्हणणे आहे. शेवटी हे प्रकरण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सांगितल्यावर त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या अधिवेशनात लक्षवेधी मांडून अशा प्रकारे विकासकांकडून फसगत झालेल्या डोंबिवलीकरांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.

रामनगर भागातील जुन्या 'आई” बंगल्याच्या जागी कळस बिल्डर्स व डेव्हलपर्सचे गौरव लिखिते व संजय बिडवे यांनी सहा मजली टॉवर बांधकाम सुरू केले. मूळचे दिव्याचे असणाऱ्या भोईर यांनी मुलांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने येथे सदनिका नोंदणी करून 93 लाख रुपये कर्ज काढून दिले. 2016 मध्ये ताबा मिळणे गरजेचे होते परंतु तो मिळण्यास विलंब झाल्याने भोईर यांनी चौकशी सुरू केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ही जमीन डोंबिवली को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या सदस्यांना चाळीस वर्षांपूर्वी अटी-शर्तींवर कब्जाहक्क रक्कम भरून फक्त रहाण्यासाठी देण्यात आली होती. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय येथे बांधकाम करता येत नाही, असा अहवाल भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर तहसीलदारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविला आहे. असे असताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नगररचना विभागाने या जमिनीवर वाढीव चटईक्षेत्र देऊन वाणिज्य वापरासह नकाशा मंजूर कसा केला? तसेच या सदनिकांचे नोंदणी दस्तावेज ही विकसकाने करून दिले ते कसे? या सर्व घोटाळ्यामुळे या बांधकामांशेजारील सोसायटीच्या म्हणजेच जिल्हाधिकारी यांच्या जागेवरील सर्वच बांधकामे अनधिकृत नाहीत का? असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हजारो डोंबिवलीकरांची फसवणूक विकसक व अधिकारी यांच्या संगनमताने झाली असण्याची शक्यता व्यक्त करून पांडुरंग भोईर यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून मला न्याय द्यावा व अनधिकृत बांधकाम तातडीने पाडावे अशी मागणी विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

मंडल अधिकारी ठाकुर्ली यांच्या अहवालानुसार तहसिलदार कल्याण यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या अहवालानुसार या प्रकरणी अटी व शर्तींचा भंग झाला हे स्पष्ट होते. त्यामुळे सर्व संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे. व हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे पोलीसांनी योग्य कारवाई न केल्यास मलाही डोक्यावरील कर्जापाई शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येचा पर्याय उरतो असे उद्विग्न पणे भोईर यांनी 'सकाळ‘ला सांगितले .

Web Title: mumbai news kalyan dombivali illegal building towers