मंजुळाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हे नोंदवण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई: भायखळा येथील महिला तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात काल दाखल करण्यात आली.

उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई: भायखळा येथील महिला तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात काल दाखल करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी ऍड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. मंजुळाचा मृत्यू गंभीर मारहाण केल्याने झाल्याचा अहवाल सादर झाला आहे. मंजुळाच्या मृत्यूनंतर शीना बोरा हत्या खटल्यातील आरोपी इंद्राणी मुखर्जीसह अन्य कैद्यांनीही आंदोलन केले होते. या प्रकरणी पोलिसांनी इंद्राणीसह काही कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाचा तपास नागपाडा पोलिसांऐवजी सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. मंजुळावर अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
तुरुंगातील सोयी-सुविधांबाबतचा तपशीलही याचिकेत देण्यात आला आहे. तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने कैद्यांना ठेवले जाते. यामुळे त्यांना पुरेशा सोयी-सुविधा मिळणे कठीण होते आणि आरोग्याचे प्रश्‍नही निर्माण होतात, असेही याचिकेत म्हटले आहे. याचिकेवर लवकरच नियमित न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Web Title: mumbai news manjula shetye killed case and court