सर्व पुलांना सरकते जिने बसवा; सर्व पक्षांच्या नगरसेवकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

मुंबई - सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावर बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूंना सरकते जिने बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर मुंबईतील सर्व पुलांवर असे जिने बसवण्यात यावेत, अशी मागणी सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत केली.

मुंबई - सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावर बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूंना सरकते जिने बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर मुंबईतील सर्व पुलांवर असे जिने बसवण्यात यावेत, अशी मागणी सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत केली.

सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता एमएमआरडीएने बांधला आहे. कुर्ला पश्‍चिमेकडे असलेला हा रस्ता एमएमआरडीएने 2015 मध्ये मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केला. हा जोडरस्ता 45.70 मीटर रुंद असल्यामुळे, तसेच या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण मोठे असल्याने बुद्ध कॉलनीजवळ पादचारी पूल बांधण्यात आला आहे; मात्र पुलाची उंची जास्त असल्यामुळे व तो नागमोडी वळणाचा असल्याने नागरिक त्याचा वापर टाळून रस्ता ओलांडतात. या पुलाचा अधिकाधिक वापर व्हावा, परिसरात अपघात होऊ नयेत, यासाठी या पुलाच्या दोन्ही बाजूला सरकते जिने बसवण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी पालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. त्यासाठी दोन कोटी 62 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली; मात्र मुंबईतील अन्य पुलांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रशासनाने अशा पुलांकडेही लक्ष द्यावे, या पुलांवरही स्वयंचलित जिने बसवावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी केली. काही पुलांच्या बाजूला गर्दुल्यांचा वावर असतो. अनेक पुलांच्या बाजूला अतिक्रमणे झाली असल्याने नागरिकांना त्रास होतो, असे नगरसेवक संजय घाडी म्हणाले. सर्व पुलांवर सरकते जिने बसवल्यास वाहतुकीची समस्याही सुटेल, याकडे अनेक नगरसेवकांनी लक्ष वेधले. वरळी नाका येथील पादचारी पुलाची अवस्था दयनीय असून आयुक्तांनी तेथे भेट देऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आशीष चेंबूरकर यांनी केली. दरम्यान, अशा पुलांची माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन प्रशासनाने दिले.

Web Title: mumbai news marathi news corporator maharashtra news