जलप्रदूषणातही तग धरून आहेत समुद्री जीव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

मुंबई - सांडपाणी, प्लॅस्टिकचा कचरा अशा विविध कारणांमुळे मुंबईचा समुद्रकिनारा प्रदूषित होत असताना या परिसरात प्रवाळ, स्टारफिश आदी दुर्मिळ समुद्री जीव मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. जलप्रदूषणाचा सामना करत हे जीव पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेत तग धरून आहेत.

मुंबई - सांडपाणी, प्लॅस्टिकचा कचरा अशा विविध कारणांमुळे मुंबईचा समुद्रकिनारा प्रदूषित होत असताना या परिसरात प्रवाळ, स्टारफिश आदी दुर्मिळ समुद्री जीव मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. जलप्रदूषणाचा सामना करत हे जीव पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेत तग धरून आहेत.

मुंबईतील समुद्रीजीवनाबाबत माहिती मिळवण्यासाठी प्रसिद्ध छायाचित्रकार प्रदीप पाताडे काही महिन्यांपासून समुद्रकिनारी सफर करत आहेत. या कामात त्यांना परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालयातून समुद्रीजीवनावर पीएच.डी. करणारे अभिषेक साटम मदत करत आहेत. मुंबईच्या किनाऱ्यांवर खेकडे, शंख-शिंपले दिसणे नेहमीचे असले तरीही आणखीही प्रवाळ, स्टारफिश, स्पोन्जेस, समुद्री पंख यांसारखे अनेक समुद्री जीव आम्हाला मुंबईतील किनाऱ्यावर आढळले. त्यापैकी बहुतांश जीव हाजी अली आणि गिरगाव परिसरात दिसले, असे साटम यांनी सांगितले. या जिवांबाबत अधिक अभ्यास होण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली.

शिवडीतील किनाऱ्यानजीकच्या दलदलीत निवटी मासा (मडस्कीपर्स) आढळतो. तेथे विविध प्रकारचे खेकडे आणि शंख-शिंपले दिसतात. स्टारफिश, प्रवाळ, स्पोन्जेस यांना आधार लागतो. ते हाजी अली, गिरगाव किनाऱ्यावरील खडकाळ जागांत आढळतात. प्रवाळ, खडक मुंबई परिसरात सहसा दिसत नसत. त्यांना विशेष क्षारता आणि तापमान लागते. तरीही हे खडक मुंबईत दिसत आहेत ही विशेष बाब आहे. मुंबईच्या किनाऱ्यांवर पूर्वी स्टारफिश मोठ्या प्रमाणावर आढळत. विविध कारणांमुळे त्यांचे प्रमाण घटले होते; मात्र आता त्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. म्हणजेच हे समुद्री जीव पर्यावरणातील बदलांना स्वीकारत असल्याचे दिसते, असे साटम यांनी सांगितले.

वाढते तापमान, जलप्रदूषण आदी घटकांचा मुंबईतील किनाऱ्यांवर आढळणाऱ्या समुद्री जिवांवर कोणता परिणाम होतो, यावर संशोधन होण्याची गरज आहे.
- अभिषेक साटम, अभ्यासक

Web Title: mumbai news Marine organisms have survived even in water pollution