सोने तस्करीत मेकॅनिकल इंजिनीअर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

मुंबई - आयातीवरील कर वाचवण्यासाठी सोन्याची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. यासाठी मेकॅनिकल इंजिनीअर तरुणांचा वापर होत असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघडकीस आले आहे. शुद्ध सोन्यापासून यंत्रांचे सुटे भाग तयार करून ते यंत्रात बसवून त्यांची सहज तस्करी करण्याचा प्रयत्न महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) हाणून पाडला. त्यांनी मंगळवारी मुंबई विमानतळावरून 11 किलो सोने जप्त केले. याप्रकरणी एका मेकॅनिकल इंजिनीअरला बुधवारी अटक केली.

मंगेश मेस्त्री (वय 30) असे अटक आरोपीचे नाव असून, तो माटुंगा येथील रहिवासी आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी 25 लाख रुपये आणि 2200 दिरहॅम जप्त केले. मेस्त्री मेकॅनिकल इंजिनीअर आहे. शुद्ध सोन्यापासून यंत्रांचे सुटे भाग तयार करून ते यंत्रांमध्ये बसवण्याचे काम तो करायचा. प्रत्येक भागासाठी त्याला 25 हजार रुपये मिळायचे, असे चौकशीत उघड झाले आहे. त्याच्यासारख्या अनेक अभियंत्यांचा सोने तस्कर वापर करून घेत असल्याची माहिती "डीआरआय'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गोतील कुरिअरच्या पॅकेजमधील यंत्रात सोने लपवल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी छापा घालून 11 किलो सोने जप्त केले.

Web Title: mumbai news mechanical engineer in gold smuggling