महावितरणकडे मीटरचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नवीन वीजजोडण्यांवर परिणाम

नवीन वीजजोडण्यांवर परिणाम
मुंबई - महावितरणमध्ये सुमार दर्जाच्या वापरण्यात आलेल्या विजेच्या मीटरमुळे संपूर्ण राज्यात सध्या मीटरचा तुटवडा भासत आहे. नव्या जोडणीसाठी मीटर देणे अशक्‍य झाले आहे. महावितरणने रोलेक्‍स कंपनीच्या मीटरमध्ये दोष आढळल्याने सुमारे साडेसात लाख वीज मीटर बाद केले होते. हे मीटर बदलण्यात येत असल्याने नवीन जोडण्यांसाठी मीटर देता येत नाहीत.

रोलेक्‍स कंपनीचे डिजिटल मीटर काही कालावधीनंतर धीम्या गतीने रीडिंग दाखवत असल्यानेच हे मीटर बदलण्यात आले. महावितरणकडे महिन्याला सुमारे दीड लाख नव्या वीजजोडणीसाठी अर्ज येतात. साडेसात लाख मीटरपैकी आता दोन लाख मीटर बदलणे बाकी आहे.

रोलेक्‍स मीटर कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. नव्या ग्राहकांच्या मागणीनुसार मीटर खरेदीची प्रक्रिया नव्याने सुरू करावी लागली आहे. त्यामुळेच नवीन ग्राहकांना मीटर मिळण्यात उशीर होत आहे. तीन पुरवठादारांकडून मीटर मागवण्यात आले आहेत. नवीन जोडणीसाठी काही दिवसांत मीटर मिळतील, असा अंदाज आहे. यापुढे मीटरची खरेदी करताना स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) सक्तीने अवलंबण्यात येत आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

महावितरणची यंत्रणा तयार असलेल्या ठिकाणी काही महिन्यांत 24 तासांत मीटर देण्यात आले आहेत. यंत्रणा नसलेल्या ठिकाणी पंधरवड्यात मीटर देणे अपेक्षित आहे; पण रोलेक्‍स मीटरमुळे सगळे गणित गडबडले आहे.

Web Title: mumbai news meter shortage to electricity