मेट्रोमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीसाठी एमएमआरडीए सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

मुंबई - पावसाळ्यात मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू असताना या रस्त्यांवर पाणी साचू नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कंत्राटदारांना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना एमएमआरडीएने दिल्या आहेत, तसेच यासाठी 24 तास नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे.

मुंबई - पावसाळ्यात मेट्रो प्रकल्पांचे काम सुरू असताना या रस्त्यांवर पाणी साचू नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कंत्राटदारांना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना एमएमआरडीएने दिल्या आहेत, तसेच यासाठी 24 तास नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे.

एमएमआरडीएमार्फत अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व "मेट्रो 7' आणि दहिसर ते डी.एन.नगर "मेट्रो 2 अ' या दोन मेट्रो प्रकल्पांचे काम गेल्या वर्षीपासून सुरू झाले आहे. या बांधकामासाठी दोन ते तीन मार्गिका बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते, तसेच शहरात विविध रस्ते आणि उड्डाणपूलांचे प्रकल्पाही पूर्ण करण्यात आले आहेत. या मार्गांवर कंत्राटदारांनी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना एमएमआरडीएने दिल्या आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांची डागडुजी करणे, रस्त्यावर जमा होणाऱ्या चिखलाची ताबडतोब विल्हेवाट लावण्याच्या सुचना दिल्या आहेत.

ज्या परिसरात पाणी साचण्याची शक्‍यता असते, अशा ठिकाणी पाणी काढण्यासाठी अतिरिक्त क्षमतेचे पंप उपलब्ध करून देण्याचे निर्देशही कंत्राटदारांना देण्यात आले असल्याचे, एमएमआरडीएचे सह प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.

पावसाळ्यातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी एमएमआरडीएने नियंत्रण कक्ष सुरू केला असून तो मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस, रेल्वे नियंत्रण कक्ष, बेस्ट, अग्निशमन दल आणि आपातकालीन नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहणार असून तो 15 ऑक्‍टोबरपर्यंत कार्यरत राहणार आहे. प्रकल्पांचे काम सुरू असलेल्या भागांमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी घेणार आहेत. तसेच झाडांची पडझड, पाणी साचणे, अपघात, वाहतूक कोंडी अशा विविध कारणांसाठी नियंत्रण कक्षातून मुंबईकरांना मदत मिळणार आहे. नागरिकांना 8080705051 व टोल फ्री क्रमांक 1800228801 या क्रमांकावर मदत मिळू शकणार आहे.

Web Title: mumbai news metro project work