घोटाळेबाज अधिकाऱ्यांच्या म्हाडाने आवळल्या मुसक्‍या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - बनावट बिले तयार करून म्हाडाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांच्या मुसक्‍या आवळण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी म्हाडाने कामाची बिले ऑनलाईन पद्धतीने काढण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. 

मुंबई - बनावट बिले तयार करून म्हाडाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांच्या मुसक्‍या आवळण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी म्हाडाने कामाची बिले ऑनलाईन पद्धतीने काढण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. 

अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने झालेले अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. गत वर्षात तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातील अधिकारी आणि कंत्राटदारांनी बोगस बिले तयार करून म्हाडाचे लाखो रुपये लाटले. एका प्रकरणात म्हाडाने कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटकही केली आहे. या दोन्ही घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी म्हाडाने समिती स्थापन केली आहे. समितीला या प्रकरणाच्या चौकशीत अनेक अडचणी येत आहेत. अधिकाऱ्यांच्या बनवाबनवीला आळा घालण्यासाठी आणि म्हाडाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सर्व मंडळांमार्फत काढण्यात येणारी बिले 1 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने काढण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. 

विविध मंडळांमार्फत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 15 दिवसांत विविध मंडळांनी 177 बिले ऑनलाईन अदा केली आहेत. यामुळे कागदोपत्री आणि धनादेशामार्फत होणारे सर्व व्यवहार म्हाडातून हद्दपार झाले आहेत. बिले काढण्यापूर्वी कंत्राटदाराला काम करण्यास दिलेली परवानगी आणि काम पूर्ण झाल्याचा तपशील वेबसाईटवर टाकल्यानंतरच ही बिले प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे बनावट बिले तयार करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांना चाप बसणार आहे. म्हाडाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी सर्व मंडळांनी काटेकोरपणे करावी, अन्यथा संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

म्हाडाचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत 177 बिले ऑनलाईन प्रदान करण्यात आली आहेत. 
- डॉ. बी. एन. बास्टेवाड, सचिव, म्हाडा

Web Title: mumbai news mhada