म्हाडा सोडतीतील विजेते घरांच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

"ओसी' नसताना घेतलेल्या रकमेवर व्याज देण्याची मागणी

"ओसी' नसताना घेतलेल्या रकमेवर व्याज देण्याची मागणी
मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत 2015 मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीतील मालाडमधील मालवणी येथील घरांना अद्यापही "ओसी' (भोगवटा प्रमाणपत्र) मिळालेली नाही. काही विजेत्यांकडून घरांची संपूर्ण रक्कम स्वीकारल्यानंतरही म्हाडाने विजेत्यांना ताबा दिलेला नाही. यामुळे विजेत्यांना बॅंकेचा हप्ता आणि सध्या राहत असलेल्या घराचे भाडेही भरावे लागत आहे. घराचा ताबा देईपर्यंत घेतलेल्या रकमेचे व्याज म्हाडाने द्यावे, अशी मागणी लाभार्थी करत आहेत.

मुंबई मंडळाने 2015 मध्ये मालवणी येथील अत्यल्प उत्पन्न गटातील 224 घरांची सोडत काढली. या सोडतीतील विजेत्यांची पात्रतानिश्‍चिती झाल्यानंतर सुमारे 170 जणांना घराची रक्कम भरण्याचे पत्र पाठवले होते. काही विजेत्यांनी घरांची सर्व रक्कम भरली आहे. काही जणांनी सुमारे 80 टक्के रक्‍कम भरली आहे. 100 टक्के रक्कम भरल्यानंतर म्हाडाने विजेत्यांना घराचा ताबा देणे आवश्‍यक होते; मात्र आजही विजेत्यांना ताबापत्र देण्यात आलेले नाही. विजेत्यांनी याबाबत म्हाडा अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांना येथील घरांना अद्याप "ओसी' मिळालेली नाही, असे सांगण्यात येत आहे.

नोटाबंदीच्या काळातही म्हाडाने रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ दिली नाही. एकदोन दिवस विलंब झाल्यानंतरही दंडाची रक्‍कम मात्र वसूल केली. म्हाडा नियमांवर बोट ठेवून कारभार करत असेल, तर "ओसी' नसताना आमच्याकडून संपूर्ण रक्कम का घेतली, असा सवाल लाभार्थी करत आहेत.

Web Title: mumbai news mhada draw winner waiting home