महापौर खासदारांचा की आमदारांचा? 

संदीप पंडित
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

विरार - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने मॅजिक फिगर पार करून 61 जागांवर विजयी पताका फडकवली असली, तरी त्यांच्या यशात सिंहाचा वाटा आयात केलेल्या उमेदवारांचाच राहिला आहे. भाजपने एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता महापौर कोण? यावर पैजा लागू लागल्या आहेत. विजयाचे शिल्पकार ठरलेले आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता आणि भाजपचे पक्ष-निरीक्षक खासदार कपिल पाटील यांच्या नातेवाईक वंदना मंगेश पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यातच सर्वांत जास्त नगरसेवकपदाचा अनुभव असलेल्या प्रभात पाटील, डॉ.

विरार - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने मॅजिक फिगर पार करून 61 जागांवर विजयी पताका फडकवली असली, तरी त्यांच्या यशात सिंहाचा वाटा आयात केलेल्या उमेदवारांचाच राहिला आहे. भाजपने एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आता महापौर कोण? यावर पैजा लागू लागल्या आहेत. विजयाचे शिल्पकार ठरलेले आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता आणि भाजपचे पक्ष-निरीक्षक खासदार कपिल पाटील यांच्या नातेवाईक वंदना मंगेश पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. त्यातच सर्वांत जास्त नगरसेवकपदाचा अनुभव असलेल्या प्रभात पाटील, डॉ. प्रीती पाटील, सुनीता भोईर आदींचीही नावे पुढे येत असल्याने महापौरपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मिरा-भाईंदरमधील भाजपची सूत्रे आमदार नरेंद्र मेहता यांनी पूर्णपणे हाती घेतल्यापासून भाजपचे शहरातील संघटन मजबूत केले. 2012 मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कडवे आव्हान असताना शिवसेनेसोबत युती करून मेहता यांनी 29 उमेदवार निवडून आणले होते. त्या वेळी भाजपच मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. यंदाच्या निवडणुकीत 70 उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी सहा महिन्यांपासून कंबर कसली होती. विरोधी पक्षाला खिंडार पाडत त्यांनी विजय साकारला असल्याचे बोलले जात आहे. 

मिरा-भाईंदर महापालिकेवर कोणाची सत्ता येणार, यावर अनेक अंदाज वर्तवण्यात येत होते. निवडणूकपूर्व सर्वेक्षणामध्ये शिवसेना बाजी मारणार, असे दिसत असताना नरेंद्र मेहता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अजूनही भाजपची लाट कायम असल्याचे दाखवून दिले. गेल्या निवडणुकीत भाजपने 31 जागा जिंकल्या होत्या. यंदा चमकदार कामगिरी करत दुप्पट जागा निवडून आणल्या. 61 पैकी 29 उमेदवार इतर पक्षांतून आयात करण्यात आलेले आहेत. त्यामुळे भाजपची ताकद वाढली असली, तरी एकंदरीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांची केवळ एकच जागा वाढल्याचे दिसते. 

आयारामांचा करिष्मा? 
भाजपने एकहाती सत्ता मिळविली असली, तरी त्यांची ताकद वाढली नसून इतर पक्षांतील आयारामांमुळे त्यांना करिष्मा साधता आला. मुख्यमंत्र्यांची जादू चालली तरी आयारामांमुळे पक्षाची ताकद वाढल्याचे चित्र आहे. इतर आयाराम आणि मूळचे भाजपवाले यांच्यात यापुढे संघर्ष होण्याची चिन्हे आतापासून दिसू लागली आहेत. थोडक्‍यात यंदाच्या निवडणुकीत भाजपवर पूर्णपणे नरेंद्र मेहता यांचे वर्चस्व राहिले असून पक्षाच्या निष्ठावंतांची पकड ढिली झाल्याचे दिसून येते. 

शिवसेनेची ताकद कमी झाली 
निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपने वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवार आयात करण्यावर भर दिला होता. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे 22 उमेदवार विजयी झाले. त्यांपैकी 12 विजयी उमेदवार आयात करण्यात आलेले आहेत. 2012 च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे 14 उमेदवार विजयी झाले होते. यंदा शिवसेनेचे स्वतःचे 10 उमेदवार विजयी झाले असून, 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत चार जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची स्वतःची अंतर्गत ताकद कमी झाली आहे.

Web Title: mumbai news Mira Bhaindar Municipal bjp Mayor