मोरबे धरण सौर प्रकल्पाचा फेरप्रस्ताव?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

नवी मुंबई - तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तडकाफडकी मोरबे धरणावरील गुंडाळलेल्या सौरऊर्जा वीज प्रकल्पाची पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला आठवण झाली आहे. महासभेने मंजूर केलेल्या या प्रकल्पाचे काय झाले, असा प्रश्‍न राष्ट्रवादीकडून स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला विचारण्यात आला. परंतु हा प्रस्ताव मुंढेंनी रद्द केला असल्याने पुन्हा फेरप्रस्ताव आणावा लागेल, असे सांगून अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी वेळ मारून नेली.

मोरबे धरणाच्या मातीच्या उतारावर सोलार पॅनेल बसवून वीजनिर्मितीच्या सुमारे १६३ कोटींच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर ११ सप्टेंबर २०१४ रोजी काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. सप्टेंबर २०१४ ते मे २०१५ या कालावधीत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार होते. यातून तयार होणारी वीज महावितरण कंपनी खरेदी करणार होती; मात्र महापालिका व महावितरणचा कोणताही करार झाला नसल्याने त्यांनी अखेर ३० डिसेंबर २०१४ रोजी वीज खरेदी करू शकत नसल्याचे पत्र दिले होते. तसेच प्रकल्पासाठी अधिक वेळ लागल्याने ते महापालिकेसाठी खर्चिक झाले होते. शिवाय, एवढी महाग वीज घेण्यास कोणी तयार नसल्याचे कारण देऊन तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सौरऊर्जा वीज प्रकल्प रद्द केला होता. मुंढेंनी घेतलेल्या या निर्णयाला जवळपास वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीला या प्रकल्पाची आठवण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काय झाले, असा प्रश्‍न राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे, परंतु हा प्रस्ताव आधीच रद्द केल्याने प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना उत्तर देताना सावध भूमिका घेतली जात आहे. मुंढे येथे येण्यापूर्वी महापालिकेत टक्केवारीची परंपरा असल्याने सत्ताधाऱ्यांना मर्जीतील कंत्राटदाराला प्रकल्पाचे कंत्राट देण्याच्या बदल्यात बिदागी मिळत होती. आता त्यासाठीच पुन्हा त्यांना या प्रकल्पाची आठवण तर होत नाही ना, अशी शंका जाणकार व्यक्त करत आहेत.

सत्ताधाऱ्यांची डाळ शिजणार?
कर्तव्यनिष्ठ व पारदर्शक कामाचा आग्रह धरणारे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी हे या प्रकल्पाबाबत पुन्हा सत्ताधाऱ्यांची डाळ शिजू देतीला का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. पालिकेचा कारभार स्वीकारल्यापासून रामास्वामी ‘ताकही फुंकून प्यावे’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक काम प्रत्यक्ष पाहून खातरजमा करूनच मंजूर करत आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे मनसुबे पूर्ण होतील का, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

Web Title: mumbai news moranmbe dam Solar project