राज्यात मातृत्व अनुदान योजना राबविणार - मुंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

मुंबई - केंद्र सरकारने प्रधान मंत्री सुरक्षित मातृत्व कार्यक्रमाची घोषणा केली आहे. ही योजना राज्यात राबविण्यासाठी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात ग्रामविकास आणि महिला व बालविकास विभागाच्या वित्त व नियोजन विभागाकडे असलेल्या प्रलंबित विषयावर आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

मुंडे म्हणाल्या की, मातृत्व अनुदान योजनेत ज्या गर्भवती महिला कोणत्याही कारणांमुळे आपली प्रसूतीपूर्व तपासणी करू शकलेल्या नाहीत त्यांना अशा प्रकारच्या तपासण्या करण्याच्या अतिरिक्त संधी उपलब्ध करून देणे, कुपोषणग्रस्त महिलांच्या बाबतीत त्यांच्या आजारांचे लवकर निदान होण्याच्या दृष्टीने योग्य व उचित व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देणे, किशोरवयीन व लवकर गर्भधारणा होणाऱ्या मुलींच्या बाबतीत त्यांना विशेष देखभालीची आवश्‍यकता असल्याने त्यांच्या गर्भधारणेच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष देणे, गर्भधारणेच्या कालावधीत गर्भावस्थेमुळे उद्भवणारा रक्तदाब, मधुमेह, अशक्तपणा (ऍनमिया) इत्यादी आजारांचे नियमित चाचण्या व तपासण्या करून उचित व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

अंगणवाडी सेविकांचे मानधन वेळेत व नियमित मिळण्यासाठी; तसेच बॅंक खात्यात थेट जमा करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 1 जुलै पासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन थेट बॅंकेत जमा होणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

Web Title: mumbai news mother subsidy scheme in state