अंबानींच्या अँटिलियाबाबत वक्‍फ बोर्डाची भूमिका काय? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

मुंबई - रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या पंचतारांकित निवासस्थानाबद्दलच्या नेमक्‍या कोणत्या वादाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे? आणि यासंदर्भात वक्‍फ बोर्डाची भूमिका नेमकी काय आहे, हे स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. 

अंबानी यांच्या कंपनीने ही मालमत्ता 2005मध्ये खरेदी केली होती. अनाथ मुस्लिम मुलांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या करिमभाई इब्राहिम ख्वाजा अनाथ ट्रस्टच्या मालकीची ही जमीन होती. याबाबत अब्दुल मतीन यांनी 2007 मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. या याचिकेशिवाय अँटिलियाबाबत उच्च न्यायालयात 66 याचिका प्रलंबित आहेत. त्यांची एकत्रित सुनावणी सुरू आहे. अँटिलियाच्या जमीन विक्रीत वक्‍फ बोर्डाने गैरव्यवहार केल्याचे मतीन यांनी आपले वकील एम. एस. चौधरी यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायाधीश नितीन जामदार यांना पटवून दिले. दरम्यान, याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याची माहिती अंबानी यांचे वकील मिलिंद साठे यांनी न्यायालयात दिली. 

वक्‍फ कायदा तयार झाल्यानंतर मुस्लिम समाजाच्या मालकी हक्काच्या सर्व जमिनी आणि मालमत्ता वक्‍फ बोर्डाच्या अखत्यारित येत असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. त्यावर वक्‍फ बोर्डाची नेमकी काय भूमिका आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात कोणत्या मुद्द्यांवर सुनावणी आहे, याची माहिती सादर करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब करण्यात आली.

Web Title: mumbai news Mukesh Ambani Antilia