आजीबाईंच्या शाळेत रंगले कविसंमेलन!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मुरबाड -‘पुस्तके शिकलो नाही म्हणून काय झाले? अजूनही पूर्णपणे लिहिता-वाचता येत नसले, तरी आमचे काही अडत नाही. आम्ही आमच्या अनुभवाच्या जोरावर कविता सादर करू शकतो’, असे सांगत फांगणे गावातील आजीबाईंनी खरोखरच सर्वांना कवितांच्या गावी नेले. ग्रामीण भागात लग्न-समारंभात गायल्या जाणाऱ्या धवल्या, अर्थात बोलीभाषेतील गाणी आणि जात्यावर दळताना गायल्या जाणाऱ्या ओव्यांच्या चालीवर या आजीबाईंनी सर्वांना ठेका धरायला लावला. प्रसिद्ध आजीबाईंच्या शाळेत शनिवारी (ता. ९) रंगलेल्या या कविसंमेलनात सारेच हरवून गेले होते. 

मुरबाड -‘पुस्तके शिकलो नाही म्हणून काय झाले? अजूनही पूर्णपणे लिहिता-वाचता येत नसले, तरी आमचे काही अडत नाही. आम्ही आमच्या अनुभवाच्या जोरावर कविता सादर करू शकतो’, असे सांगत फांगणे गावातील आजीबाईंनी खरोखरच सर्वांना कवितांच्या गावी नेले. ग्रामीण भागात लग्न-समारंभात गायल्या जाणाऱ्या धवल्या, अर्थात बोलीभाषेतील गाणी आणि जात्यावर दळताना गायल्या जाणाऱ्या ओव्यांच्या चालीवर या आजीबाईंनी सर्वांना ठेका धरायला लावला. प्रसिद्ध आजीबाईंच्या शाळेत शनिवारी (ता. ९) रंगलेल्या या कविसंमेलनात सारेच हरवून गेले होते. 

चौथीतील विधी केदार या विद्यार्थिनीने कविसंमेलनाची सुरुवात केली. २५ आजीबाईंनी संमेलनात दमदार कविता सादर केल्या. यात आजीबाईंच्या शाळेतील पाच जणी होत्या. संमेलनाच्या निमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वारावर कमान बांधून दोन्ही बाजूला दोरीवर पुस्तके टांगण्यात आली होती. ही अनोखी सजावट प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती.

 कै. मोतिराम गणपत दलाल ट्रस्ट आणि इनरव्हील क्‍लब अंबरनाथ हिल्स यांच्या वतीने हे संमेलन घेण्यात आले होते. याच्या अध्यक्षस्थानी मंगला सारडा होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक दिलीप दलाल, इनरव्हील क्‍लबच्या अध्यक्ष स्वाती जगताप, साहित्यिक अरविंद बुधकर, ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर दळवी, टाटा सामाजिक संस्थेच्या भारती देशपांडे आदी या वेळी उपस्थित होते.

चला चला, जाऊ बाई 
आजीबाईंच्या शाळेला
पाटी आणि पेन्सिल घेऊ 
जाऊ शिकण्याला...
अडाणी मी गोळा बाई 
मन माझं उदास
हुरहुर वाटे बाई 
कधी मी शिकेन
बुक दिले नवे कोरे 
वाचायला हातात
डोळे असून वाचायला 
मला नाही येत

ही कविता सादर करीत आजी कांताबाई मोरे यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अशा अनेक कवितांनी आजीबाईंनी संमेलनात रंगत आणली आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप दलाल यांनी; तर सूत्रसंचालन योगेंद्र बांगर यांनी केले. नितेश डोंगरे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी आजीबाईंच्या शिक्षिका शीतल मोरे, शिवळे आणि गोवेली महाविद्यालयातील विद्यार्थी, १गर्जा कलामंच; मुरबाड!चे सदस्य उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना या वेळी पुस्तके भेट देण्यात आली. या वेळी कवयित्री स्नेहल केळुस्कर यांनी आजीबाईंच्या शाळांची परीक्षा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र बोर्डाची स्थापना करावी, अशी मागणी केली.

कवितांचे गाव होणार
या कविसंमेलनाच्या निमित्ताने फांगणे गाव ‘कवितांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध होण्याकरिता शनिवारी पहिले पाऊल पडले. गावातील तानाजी आत्माराम देशमुख यांच्या घरात ‘बहिणाबाई चौधरी यांचे कवितांचे घर’ म्हणून सुरुवात करण्यात आली. घराच्या ओटीवर बहिणाबाईंचे नाव आणि त्यांचे छायाचित्र, कवितांबद्दल माहिती लावण्यात आली होती. भविष्यात फांगणे गावातील ५० घरांमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध ५० कवींची माहिती लावण्यात येणार आहे, अशी माहिती फांगणे येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक योगेंद्र बांगर यांनी दिली.

‘सकाळ’चे आभार
२०१६ मध्ये जागतिक महिलादिनी सुरू झालेल्या आजीबाईंच्या शाळेला सर्वप्रथम ‘सकाळ’ने प्रसिद्धी दिली. त्यामुळे या शाळेची कीर्ती सातासमुद्रापार पोहचली, असे दिलीप दलाल यांनी भाषणात सांगत ‘सकाळ’चे आभार मानले.

Web Title: mumbai news murbad grand mother kavi sammelan