नवीन पुलांना अल्प प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड व मध्य रेल्वेच्या करी रोड स्थानकात लष्कराने बांधलेले पूल मंगळवारी (ता. 27) प्रवाशांसाठी खुले केले. लष्कराने बांधलेला पूल पाहण्यासाठी प्रवासी गर्दी करतील, अशी शक्‍यता होती; मात्र पूल सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या पुलांवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या नगण्य होती. अनेक प्रवासी सवयीप्रमाणे रेल्वे रूळ ओलांडताना दिसले. 

दादर फुलमार्केट येथे जाणारे हजारोंच्या संख्येने प्रवासी दररोज एल्फिन्स्टन स्थानकातून प्रवास करतात; मात्र बुधवारी नेहमीप्रमाणे काही प्रवाशांनी पुलाचा वापर न करता रेल्वे रूळ ओलांडत प्रवास केला. अशीच परिस्थिती मध्य रेल्वेवरील करी रोड स्थानकात बांधलेल्या पुलावरही दिसून आली. बुधवारी जरी कमी गर्दी असली, तरी होळीला मोठ्या संख्येने फुल खरेदी करण्यासाठी येणारा प्रवासी वर्ग या पुलाचा वापर करण्याची शक्‍यता आहे. होळीची सुट्टी आणि शनिवार, रविवार सुट्टी आल्याने प्रत्यक्षात या पुलाचा वापर किती होतो, हे सोमवारनंतरच स्पष्ट होईल. सोमवारी नियमितपणे सर्व कार्यालये सुरू होतील, त्यामुळे या मार्गावरून सोमवारपासून प्रवासी संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सध्या करी रोड स्थानकातील लष्कराच्या पुलाला उतरण्यासाठी सरकता जिना बसवण्याचे काम सुरू आहे. 

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लष्कराने बांधलेल्या या पुलांवर सीसी टीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. काही दिवस लष्करातील एक जवान तिथे तैनात असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. रेल्वेस्थानकातील पुलावरून फुलांचा ओझा वाहून नेताना वर्दळीच्या वेळी त्रास होत होता. नवीन पूल हा सुटसुटीत व मोठा आहे. याचा फायदा आम्हा फुलमार्केटला येणाऱ्या हजारो प्रवाशांना होणार असल्याचे फुलविक्रेते धोंडू पाटील म्हणाले. लष्कराने मुंबईकरांसाठी पूल बांधले, ही अभिमानाची गोष्ट आहे. या पुलांवरून प्रवास करताना सुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे माटुंगा स्थित प्रवासी कैलास कोयंडे यांनी म्हटले. 

Web Title: mumbai news new bridge mumbai western railway