अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा राज्यात बाजार - चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

मुंबई - झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातून नुकतेच निवृत्त झालेले मुख्याधिकारी विश्वास पाटील यांना बदली थांबविण्यासाठी एका माजी मुख्य सचिवांनी सात कोटी रुपयांची लाच मागितल्याची माहिती समोर आली असून, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. राज्यात बदल्यांचा बाजारच मांडला गेल्याचे यावरून दिसून येते. या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.

"एसआरए'चे एक मुख्याधिकारी नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यांनी त्यांची बदली थांबविण्यासाठी माजी मुख्य सचिवांनी सात कोटी रुपयांची लाच मागितली होती, असा आरोप एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. बदली थांबविण्यासाठी सात कोटी मागण्यात येत असतील, तर बदली करण्यासाठी किती मागण्यात येत असतील? तसेच या अधिकाऱ्याने त्या माजी मुख्य सचिवाचे नावही घेतले होते. यावरून राज्यात बदल्यांचा बाजारच मांडला गेला आहे काय, असे वाटते. मागे "सहारा स्टार' या हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला तेव्हा कोट्यवधींची रक्‍कम व धनादेश सापडले होते. बदल्यांचे रॅकेट तेथे चालविण्यात येत होते, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

संबंधित अधिकाऱ्याला अटक करून त्याची चौकशी करण्यात यावी, व हे संपूर्ण प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: mumbai news Officers exchange market in the state