वर्गखोल्यांसोबत शिक्षक आणि कर्मचारी संख्या वाढविणार
मुंबई - चर्चगेटचे आशिया खंडातील सर्वांत जुने आणि नामांकित शासकीय विधी महाविद्यालयाचे लवकरच नूतनीकरण होणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी अतिरिक्त वर्गखोल्यांसोबत शिक्षक आणि कर्मचारी संख्याही या नूतनीकरणासोबत वाढविण्यात येणार आहे.
14 सप्टेंबरला शासकीय समितीने (गव्हर्निंग काऊन्सिल) शासकीय विधी महाविद्यालयाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला. याच महाविद्यालयातून विधी पदवीधर झालेले अनेक विद्यार्थी सध्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असल्याने अशा महाविद्यालयाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव रखडवणे अयोग्य असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. महाविद्यालयाच्या नूतनीकरणासोबत अतिरिक्त शिक्षक आणि कर्मचारी वर्ग लागणार असल्याने त्यासाठी अतिरिक्त निधीची गरज लागणार आहे. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सध्या महाविद्यालयात तीन व पाच वर्ष विधी अभ्यासक्रमासाठी नऊ कायमस्वरूपी तर 27 व्हिझिटिंग फॅकल्टीचे शिक्षक अध्यापनाचे काम करत आहेत.
विद्यार्थीसंख्या घटवली
1855 साली स्थापन करण्यात आलेल्या या महाविद्यालयात जुन्या आणि नव्या इमारतीत मिळून एकूण 17 वर्गखोल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, न्या. एम. सी. चागला, सर मोतीलाल सेटलवाड, सर दिनशॉ मुल्ला, न्या. वाय. व्ही. चंद्रचूड, नानी पालखीवालासारख्या नामवंत व्यक्तींनी या महाविद्यालयात विद्यार्थी तसेच अध्यापक म्हणून काम केले आहे. अपुऱ्या सोईसुविधांचे कारण पुढे करत, मुंबई विद्यापीठाने नुकतीच या महाविद्यालयात तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थीसंख्या 280 हून 180, तर पाच वर्ष अभ्यासक्रमांसाठी 120 पर्यंत कमी केली होती. त्यानंतर याबाबत मोठ्या रोषाला सामोरे जावे लागल्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालयाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्यास मान्यता देण्यात आली आहे.
|