मुंबई - सहार विमानतळावर दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून तब्बल एक कोटी रुपयांचे विदेशी चलन हवाई गुप्तचर विभागाने जप्त केले. त्यात एक लाख 19 हजार अमेरिकन डॉलरचा समावेश आहे. प्रवाशांविरोधात सीमा शुल्क कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
हवाई गुप्तचर विभागाचे पथक मंगळवारी (ता. 21) विमानतळावर गस्त घालत असताना दुबईहून आलेल्या रजत गंभीर या प्रवाशाच्या साहित्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या बॅगेत एक लाख 19 हजार अमेरिकन डॉलर्स सापडले. त्याची भारतीय बाजारभाव किंमत 76 लाख 75 हजार असल्याचे हवाई गुप्तचर विभागाने सांगितले. फेमा कायद्याखाली त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला. त्याची चौकशी सुरू आहे.
दुसऱ्या एका घटनेत बुधवारी (ता. 22) पहाटे तलिश मिर्झा नावाच्या प्रवाशाला सहार विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाच हजार अमेरिकन डॉलर्स आणि एक लाख 20 हजार दिराम (अरबी चलन) जप्त केले. या चलनाची किंमत 23 लाख 86 हजार 500 आहे. तलिशने बुटामध्ये चलन लपवून आणल्याचे हवाई गुप्तचर विभागाने सांगितले.
|