उघड्यावर शौच ही संस्कृती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

मुंबई - उघड्यावर शौच करणे मुंबईकरांच्या सवयीचे झाले आहे. काहींना उघड्यावर शौच करणे ‘संस्कृती’चा भाग वाटतो; तर काहींपुढे दुसरा पर्याय नसल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्राचे सल्लागार लिओ हेलर यांनी मांडले आहे. त्यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ अपयशी ठरल्याचा निष्कर्षही काढला आहे.

मुंबई - उघड्यावर शौच करणे मुंबईकरांच्या सवयीचे झाले आहे. काहींना उघड्यावर शौच करणे ‘संस्कृती’चा भाग वाटतो; तर काहींपुढे दुसरा पर्याय नसल्याचे निरीक्षण संयुक्त राष्ट्राचे सल्लागार लिओ हेलर यांनी मांडले आहे. त्यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’ अपयशी ठरल्याचा निष्कर्षही काढला आहे.

हेलर यांनी भारत भेटीदरम्यान समाजातील विविध घटकांशी बोलून वरील निरीक्षण नोंदवले आहे. दोन आठवड्यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांनी मुंबई, दिल्ली, लखनौ, कोलकाता, इंफाळ आदी शहरांना भेट दिली. अनेक शहरांमध्ये सरकारी कार्यालये तसेच गृहभेटींतून हेलर यांनी पाण्याची सोय आणि शौचालयांची सुविधा-सेवांबाबत अभ्यास केला. त्याचा सविस्तर अहवाल, निष्कर्ष आणि सूचना सप्टेंबर २०१८ मध्ये होणाऱ्या ह्युमन राईट्‌स काऊन्सिलमध्ये मांडण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात ११८ ठिकाणी नागरिक उघड्यावर शौचास जात होते. त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येकी ५०० मीटर अंतरावर सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले, परंतु उघड्यावर शौचास जाणे हा सवयीचा भाग असल्याचे हेलर यांना प्रथमदर्शनी आढळले. अनेकांना उघड्यावर शौचास जाणे सोयीचे वाटते; तर काहींना उघड्यावर जाण्याशिवाय पर्याय नसतो, असेही निरीक्षण हेलर यांनी नोंदवले.

पाण्यासाठी जास्त पैसे
पाण्यासाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागतात. स्वच्छतेसाठी पाणी देण्याच्या बाबतीत सरकारी यंत्रणा ढिम्म आहेत, असेही हेलर यांना आढळले. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कौला बंदर परिसरातील सात हजार झोपडीधारकांना २० लिटर पाण्यासाठी २० रुपये मोजावे लागतात. पाणीमाफिया हा धंदा चालवतात आणि मुंबई महापालिका मात्र असा प्रकार होत नसल्याचा दावा करते, असेही हेलर यांचे निरीक्षण आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींना पाणी मिळत नसल्याचे वास्तव हेलर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. राष्ट्रीय उद्यानात सुमारे १२ हजार लोकवस्ती आहे. ती मुंबईपासून ३० ते ४० किलोमीटरवर आहे. तरीही राज्य किंवा केंद्र सरकारच्या यंत्रणांनी त्यांना कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. शौचालये नसल्यामुळेच उघड्यावर शौचाला जाण्याशिवाय पर्याय नाही, असे तेथील नागरिकांनी हेलर यांना सांगितले.

मानवी विष्ठा  उचलण्याचा प्रकार
मानवी विष्ठा हाताने उचलण्याच्या प्रकाराला आळा घालण्यात भारताला अपयश आल्याचेही हेलर यांचे मत आहे. शौचालये मलनिःसारण वाहिनीला जोडली जात नसल्याने ही समस्या आणखी भीषण असल्याचे हेलर यांचे मत आहे. हाताने मानवी विष्ठा उचलण्याचा प्रकार भारतात अनेक ठिकाणी सुरू आहे. काही ठराविक जातीच्या लोकांना हे काम करावे लागते. हागणदारीमुक्तीसाठी केवळ शौचालय बांधून उपयोग नाही, तर लोकांची मानसिकता बदलणे, पुरेशा प्रमाणात पाणी देणे, कमी खर्चाची शौचालये उभारणे आदी पर्याय असल्याचे हेलर यांचे म्हणणे आहे.

पाण्यासाठी वणवण
भारतातील अनेक शहरांतील झोपडपट्ट्यांमध्ये पुरेसे पाणी आणि शौचालयांची सुविधा नसणे हे वास्तव हेलर यांना आढळले. दिल्ली, लखनौ, कोलकाता आणि मुंबईत ही समस्या गंभीर आहे. मुंबईत १८ लाख झोपडीधारक आहेत. शहराची निम्मी लोकसंख्या झोपड्यांमध्ये राहते, पण त्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचे आणि शौचालयांची सुविधा नसल्याचे हेलर यांच्या निदर्शनास आले. मानखुर्दच्या भीम नगर आणि महाराष्ट्र नगरमधील १६० घरांमधील सर्वांना पाणी आणण्यासाठी वणवण करण्याशिवाय पर्याय नसतो, असेही त्यांना आढळले. ठराविक वेळेतच पाणी मिळत असल्याने पाण्याशी संबंधित कामे त्याच वेळेत उरकावी लागतात, असेही हेलर यांना प्रत्यक्ष भेटीदरम्यान आढळले.

Web Title: mumbai news Open defecation