अवयवदानासाठी जागर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - ‘सकाळ’ (मुंबई) आवृत्तीच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्ताने यंदा जागर होणार आहे तो अवयवदानाचा! मृत्यूनंतर पुन्हा जगण्याची संधी म्हणजे अवयवदान, असे म्हटले जाते; परंतु त्याबाबत गैरसमजच अधिक असल्याने त्यासाठी हवे तितके दाते उपलब्ध होत नाहीत. हे दाते उपलब्ध व्हावेत आणि हे दानही सत्पात्री व्हावे यासाठी ‘सकाळ’ने ‘मिशन ऑर्गन डोनेशन’ उपक्रमाअंतर्गत अवयवदानाच्या चळवळीला बळ दिले आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता. २८) नवी मुंबईतील खारघरमध्ये प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा हिची लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे.

मुंबई - ‘सकाळ’ (मुंबई) आवृत्तीच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्ताने यंदा जागर होणार आहे तो अवयवदानाचा! मृत्यूनंतर पुन्हा जगण्याची संधी म्हणजे अवयवदान, असे म्हटले जाते; परंतु त्याबाबत गैरसमजच अधिक असल्याने त्यासाठी हवे तितके दाते उपलब्ध होत नाहीत. हे दाते उपलब्ध व्हावेत आणि हे दानही सत्पात्री व्हावे यासाठी ‘सकाळ’ने ‘मिशन ऑर्गन डोनेशन’ उपक्रमाअंतर्गत अवयवदानाच्या चळवळीला बळ दिले आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता. २८) नवी मुंबईतील खारघरमध्ये प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा हिची लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे. सायंकाळी सहापासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात धमाल गाण्यांची मैफल रंगणार असून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अवयवदानाबाबत जनजागृती होणार आहे. 

आपल्या अनोख्या गायकीने सोना मोहपात्राने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर गारूड केले. अभिनेता आमीर खान याच्या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात तिने गायलेल्या ‘ओ री चिरय्या’ आणि ‘मुझे क्‍या बेचेगा रुपया’ गाण्यांनी तिने आपल्या गायकीची अन्‌ सामाजिक जाणिवेची छाप पाडली. रविवारी होणाऱ्या कार्यक्रमात ती आपल्या विविध गाजलेल्या गाण्यांसह मराठी गीतेही सादर करणार आहे. ‘सकाळ’च्या अवयवदानासाठीच्या जनजागृतीत तिचा हा आवाजी सहभाग राहणार आहे! खारघरच्या सेंट्रल पार्कमधील ॲम्फी थिएटरमध्ये रंगणारी ही मैफल रसिकांसाठी विनामूल्य आहे.

चळवळ अधिक व्यापक हवी!
अवयवदानाबाबत वैचारिक क्रांती होण्याची नितांत गरज आहे. अवयवदानाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ‘सकाळ’ने एक पाऊल उचलले असून ‘मिशन ऑर्गन डोनेशन’ उपक्रमाअंतर्गत जनजागृती सुरू केली आहे. मान्यवरांचे पाठबळही त्याला मिळत आहे...

सध्या विविध कारणांमुळे अवयवदानाची गरज वाढते आहे. त्यामुळे अवयवदान करण्यासाठी सर्वांनीच पुढे येण्याची जरुरी आहे. अवयवदानाने आपण दुसऱ्याला जीवदानही देऊ शकतो. ‘सकाळ’ने सुरू केलेल्या चळवळीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जागृती होईल. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी मला खात्री आहे. 
- अजोय मेहता (आयुक्त, मुंबई महापालिका)

आयुष्यभर आपण समाजाकडून काही ना काही घेत असतो. आयुष्य संपल्यानंतर त्याची उतराई होण्याची संधी आपल्याला अवयवदानातून मिळते. मरणानंतर दुसऱ्यांचे आयुष्य फुलविण्याचा विचार करावा. अवयवदानाविषयी फार जनजागृती होत नसल्याचे दुःख वाटते; परंतु साहित्याच्या माध्यमातून मी नेहमीच त्याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करीत आलो आहे. चळवळीत मीही सहभागी आहे. 
- प्रवीण दवणे (साहित्यिक) 

अवयवदान समाजासाठी खूपच आवश्‍यक आहे. मोक्षप्राप्तीसाठी काहीजण आयुष्यभर आटापिटा करीत असतात. त्यातूनच अंधश्रद्धा पसरलेली आहे. त्यासाठी जनजागृती आवश्‍यक आहे. ‘सकाळ’ अनेक विधायक कामे करीत आलेले आहे. ती परंपरा अवयवदानाने अधिक समृद्ध झाली आहे. 
- अदिती तटकरे  (अध्यक्षा, रायगड जिल्हा परिषद)

Web Title: mumbai news Organ donation sakal