पालघर व जालना जिल्हा हागणदारीमुक्त - बबनराव लोणीकर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

मुंबई - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील पालघर आणि मराठवाड्यातील जालना हे दोन जिल्हे हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील पालघर आणि मराठवाड्यातील जालना हे दोन जिल्हे हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

लोणीकर म्हणाले, 'यापूर्वी राज्यातील 34 जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि वर्धा हे 11 जिल्हे 2016-2017 मध्ये हागणदारीमुक्त झाले आहेत. 351 तालुक्‍यांपैकी 173 तालुके, तर 27 हजार 667 ग्रामपंचायतीपैकी 19 हजार 306 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. हे प्रमाण देशातील ग्रामपंचायतीच्या 17 टक्‍के आहे. राज्यातील 40 हजार 520 महसुली गावांपैकी 28 हजार 195 गावे हागणदारीमुक्त घोषित केली आहेत.''

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या भारतात स्वच्छ भारत मिशनची (ग्रामीण) सुरवात 2 ऑक्‍टोबर 2014 पासून झाली तेव्हापासून महाराष्ट्रात ग्रामीण भागात आजपर्यंत सुमारे 43 लाख शौचालयांचे बांधकाम झाले असून केवळ 12 लाख शौचालयांचे बांधकाम होणे शिल्लक आहे. ग्रामीण भागात 88 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. जालना जिल्ह्यात पायाभूत सर्वेक्षण 2012 नुसार केवळ 33 टक्के कुटुंबांकडे शौचालये होती. 2017 मध्ये 100 टक्के कुटुंबांनी शौचालय बांधून त्याचा वापर सुरू केला आहे, '' असे त्यांनी सांगितले.

पालघर जिल्हा हा 82 टक्के आदिवासी जिल्हा आहे. विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे पूर्णत: आदिवासी तालुके आहेत. पायाभूत सर्वेक्षणावेळी जिल्ह्यात 52 टक्के कुटुंबाकडे शौचालय होती. ती आता 100 टक्‍क्‍यांपर्यंत पोचली असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली. तसेच संपूर्ण देशात हागणदारीमुक्त ग्रामपंचायतींच्या संख्येत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील व्यक्तींना पुरस्कार
स्वच्छतेच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञान शोधलेल्या संस्था व्यक्तींसाठी घेतलेल्या स्पर्धेत राज्यातील सचिन जोशी, मिलिंद व्यवहारे, गणेश सावंत यांना "स्वच्छथॉन' पुरस्कार देण्यात आला. लघुपट आणि निबंधलेखन स्पर्धेत प्रशांत पांडेकर यांना देशस्तरावरील प्रथम पुरस्कार मिळाला, तर विनेय किरपाल यांना विशेष पुरस्कार मिळाला, अशीही माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली.

Web Title: mumbai news palghar and jalana district hagandari free