पाम बीच मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

तुर्भे - १७ वर्षांखालील फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेसाठी येणाऱ्यांची गर्दी आणि तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाम बीचवरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नेरूळ ते वाशीकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्ता पुन्हा उखडला आहे. परिणामी वाहनांचे टायर फुटून अपघात होत आहेत.

तुर्भे - १७ वर्षांखालील फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेसाठी येणाऱ्यांची गर्दी आणि तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाम बीचवरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नेरूळ ते वाशीकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्ता पुन्हा उखडला आहे. परिणामी वाहनांचे टायर फुटून अपघात होत आहेत.

पाम बीच मार्गाची लांबी ९ किलोमीटर आहे. वाशीकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्ता पुन्हा उखडला असल्याने अपघात होत आहेत. पाम बीच मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने मायक्रो सर्फेसिंग या जर्मन तंत्राच्या साह्याने डागडुजी केली होती. हा डांबरीकरणाला स्वस्त आणि टिकाऊ पर्याय असल्यामुळे पालिकेचे कोट्यवधी रुपये वाचले; परंतु काही दिवसांतच हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. या मार्गावर नागमोडी वळणे असून खडी वर आल्याने टायर फुटण्याचे प्रमाणही वाढले आहे. ताशी ६० किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची परवानगी असलेल्या मार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पनवेल, उरणसह नवी मुंबईतील बेलापूर, सीवूड्‌स, नेरूळ या भागांतील रहिवासीही मुंबई तसेच ठाण्याकडे जाण्यासाठी शीव-पनवेल मार्गाऐवजी पाम बीच मार्गाला प्राधान्य देतात; तसेच पाम बीचजवळच ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ असल्यामुळे येथे पर्यटकांचीही गर्दी असते. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ वाढली आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि नवी मुंबईतील नागरिकांच्या सोईसाठी सिडकोने पाम बीच मार्ग बांधला आहे. निसर्गरम्य आणि चांगल्या दर्जाचा हा मार्ग असल्याने तो वाहनचालकांसाठी आकर्षण ठरला. परंतु तो महापालिकेकडे हस्तांतरीत केल्यानंतर त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे पालिकेने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे यामार्गाची दुरवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पालिकेने या रस्त्याची दुरुस्ती केली होती. त्यावर मोठा खर्च केला होता. परंतु दोन-तीन दिवस आणि तोही फारसा जोरात पाऊस पडला नसतानाही हा रस्ता खराब झाल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी वापरलेले मटेरियल योग्य दर्जाचे होते का? अशी शंका निर्माण झाली आहे.

नवी मुंबईकरांना भुर्दंड
पाम बीच मार्ग सिडकोने २००७ मध्ये पालिकेला हस्तांतरित केला. तेव्हा पालिकेने या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली होती. त्यासाठी १४ कोटी रुपये खर्च केले होते. नवी मुंबई पालिका प्रशासनाकडून दीड वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला जात होता; मात्र तो मंजूर करण्यात आला नव्हता. अखेर स्थायी समितीने याला नुकतीच मंजुरी दिली आणि कामाला वेग आला. या कामासाठी तब्बल सात कोटी खर्च पालिकेकडून केला जात आहे. कामाची डेडलाईन १५ ऑक्‍टोबर असतानादेखील रस्त्याचे खड्डे पुन्हा वर आले. याचा भुर्दंड नवी मुंबईकरांना भरावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: mumbai news pam beach potholes