पत्राचाळीच्या प्रश्नावरून शिवसेना आणि काँग्रेसने भाजपाला घेरलं; केलेत गंभीर आरोप

कृष्ण जोशी
Thursday, 18 February 2021

हे फक्त मगरीचे नक्राश्रू आहेत, अशी जळजळीत टीका शिवसेना व कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली

मुंबई, ता. 18 :  स्वतः पाच वर्षे सत्तेत असताना गोरेगावच्या पत्राचाळीचा पुनर्विकास प्रश्‍न चिघळवणाऱ्या भाजप नेत्यांना आता सत्ता गेल्यावर या प्रश्‍नाची आठवण आली आहे. हे फक्त मगरीचे नक्राश्रू आहेत, अशी जळजळीत टीका शिवसेना व कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. सिद्धार्थनगर येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्‍न अनेक वर्षे रखडला आहे. त्याच्या निषेधार्थ तेथील रहिवाशांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

महत्त्वाची बातमी : बायकोची तंबाखूची सवय नवऱ्याला पटत नसेल तर घटस्फोट मिळतो का ? उच्च न्यायालयाने दिला निकाल

बुधवारी त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गोरेगावातील भाजपचे सर्व नगरसेवक-आमदार आदींनी भेट दिली. हा प्रश्‍न सरकार दरबारी मांडण्याचे आश्‍वासनही फडणवीस यांनी दिले; मात्र स्वतः पाच वर्षे मुख्यमंत्री असताना तसेच गोरेगावातील आमदार-नगरसेवक भाजपचेच असताना गेली पाच वर्षे काय केलेत, असा प्रश्‍न शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे व कॉंग्रेस नेत्या माधवी राणे यांनी विचारला आहे. 

भाजप नेत्यांना आता या प्रश्‍नाची आठवण झाली आहे. येथील आमदार विद्या ठाकूर तर राज्यमंत्री होत्या. तेव्हा त्यांना हा प्रश्‍न सोडवणे सहज शक्‍य होते. तरीही त्यांनी या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले. गोरेगावात पुन्हा शिवसेनेला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याने भाजप नेत्यांना लोकांच्या प्रश्‍नांची आठवण झाली, असा टोला दिलीप शिंदे यांनी लगावला.

महत्त्वाची बातमी :  आता थेट दाखल होणार FIR; पुन्हा डोकं वर काढणारा कोरोना आणि नियंत्रणासाठीचा मेगाप्लान वाचा

अरुंद रस्त्यांवरील जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने तेथे होणारी वाहतूक कोंडी, अडलेले नाले व त्यामुळे सखल भागात साठणारे पावसाचे पाणी हे प्रश्‍न तसेच आहेत. त्यास भाजप सरकार जबाबदार आहे; पण महाविकास आघाडी सरकार हे सारे प्रश्‍न सोडवेल, असा दावा कॉंग्रेस नेत्या माधवी राणे यांनी केला.  

mumbai news patra chawl issue shivsena and congress targets bhartiy janata party

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news patra chawl issue shivsena and congress targets bhartiy janata party