दगडखाणींमुळे प्रदूषणात वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

दगडखाणींमुळे प्रदूषण वाढले असून, त्या भविष्यात धोक्‍याच्या ठरू शकतात. या दगडखाणी कायम बंद व्हाव्यात, यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती व राष्ट्रीय हरित लवादाकडे पाठपुरावा सुरू आहे. दगडखाणींमुळे पर्यावरणाची हानी तर होतेच; पण मानवी आरोग्यासाठीही त्या धोकादायक आहेत. 
- सुकुमार किल्लेदार, अध्यक्ष,  सेव्ह मॅंग्रोज ऍण्ड एकजिस्टन (सामने) 

तुर्भे  - दगडखाणींमुळे प्रदूषणात 10 टक्के वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना श्‍वसनविकारांचा सामना करावा लागत आहे. याच दगडखाणींमुळे परिसरातील जमिनींचीही हानी झाली आहे. दगडखाणींच्या धुळीचा थर जमिनीवर पसरल्याने त्यांचा वापर कशासाठी करायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नवी मुंबईत सर्वाधिक खाणी नेरूळ परिसरात असल्याने तेथील जमिनींची अपरिमित हानी झाली आहे. 

राष्ट्रीय हरित लवादाने शिळ फाटा परिसरात दगडखाणी सुरू करण्यास हरकत नसल्याचा निर्णय दिला आहे. 20 खाणमालकांनी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, प्रत्यक्षात या दगडखाणींमुळे प्रदूषण होत असल्याचे आणि त्या नागरिकांच्या आरोग्य व जमिनींसाठी हानिकारक असल्याचे निष्पन्न झाले आहे. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दगडखाणी आहेत. तुर्भे येथे 92, नेरूळ- 106, कोपरखैरणे- आठ व दिघा येथे तीन दगडखाणी आहेत. त्यामुळे परिसरातील त्मिनींची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. असे असूनही बड्या नेत्यांनी आपल्या राजकीय बळाचा वापर करून या दगडखाणी सुरू ठेवल्या. परिणामी परिसरातील जमिनी वाया गेल्या आहेत. त्यामुळे आता या जमिनीवर रोपलागवड, जलसंधारण, डेब्रिजचा भराव करण्याची नामुष्की आली आहे. 

हवेतील धूलिकणांत वाढ 
दगडखाणींमुळे कोपरखैरणे व नेरूळ परिसरातील हवेत धूलिकण वाढल्याने या परिसरात 10 टक्के अधिक प्रदूषण असल्याचे स्पष्ट झाले आहे. धुलीकणामुळे श्वसन विकारांमध्ये वाढ झाल्याचे पालिकेनेही मान्य केले आहे. पर्यावरण अहवालातही याची नोंद आहे. दगडखाणींमुळे जमिनीच्या वरच्या थराची हानी झाली आहे; जी आता भरून काढता येणे अवघड आहे. या जमिनी वन खात्याच्या अखत्यारीत असल्याने या जागेवर रोपलागवड केल्यास या जमिनी वापरात येणे शक्‍य आहे. 

Web Title: mumbai news pollution Stone mining